इंदुरीकरांच्या समर्थनासाठी बाभळीच्या काट्यावर झोपले भगवान महाराज

Navmaharashrtra News

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उठलेल्या वादळात त्यांच्या समर्थनांत बीड जवळील तांदळवाडी येथील महादेव मंदिरातील भगवान महाराज यांनी चक्क बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना सुरू केली. उद्यापर्यंत प्रशासनाला यांची कसलीच माहिती नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

बीड पासून 22 किलोमीटर अंतरावरील तांदळवाडी गावातील महादेव मंदिरात, गतवर्षी याच महाराजांनी पाऊस पडू दे म्हणून झाडावर स्वतःला टांगून घेऊन साधना केली होती. आता चक्क इंदुरीकर यांना त्रास झाला म्हणून बाभळीच्या टोकदार काट्यावर निद्रस्त होऊन साधना सुरू केली. भगवान महाराज हे मूळचे लिंबारुई या गावातील असुन त्यांचा बारा वर्षांचा तप आहे. गेल्या दोन वर्षांपासून तांदळवाडी येथील संगमेश्वर संस्थानात ते वास्तव्यास आहेत. इंदुरीकर यांच्या टीकेवरून वांदग उठले आहे. अध्यात्म धोक्यात आल्याचं सांगत भगवान महाराज यांनी अशी कठोर साधना सुरू केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. इंदुरीकर यांनी मंगळवारी पत्र प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही अध्यात्मावर डाग नको, म्हणून ही साधना सुरू असल्याचे भगवान महाराजांनी सांगितले आहे. मात्र ही खडतर साधना पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

शिवभोजन नंतर आता भाजपाची दीनदयाळ थाळी

Navmaharashtra News

शिवसेनेच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीनंतर आता भाजपाने आता दीनदयाळ थाळी चालू केली आहे. पंढरपूरमधून या दीनदयाळ थाळी योजनेची सुरुवात झाली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना डोळयासमोर ठेऊन या भाजपाने दीनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे.

शिवभोजन थाळीच्या तुलनेत दीनदयाळ थाळीची किंमत थोडी जास्त आहे. पण या थाळीमध्ये १० पदार्थ आहेत. शिवभोजन थाळी १० रुपयांना तर, दीनदयाळ थाळी ३० रुपयांना आहे. शिवभोजन थाळीत भात, भाजी, वरण आणि पोळी असे चार पदार्थ दिले जातात.तर दीनदयाळ थाळीमध्ये तीन चपात्या, डाळ, भात, भाजी, चटणी, पापड, लोणचे, कांदा लींबू याचा आस्वाद घेता येईल.विठ्ठल मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ ही थाळी आजपासून सुरु झाली आहे.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीचा शुभारंभ झाला. पंढरपूरातील एका महिला बचत गटाला सोबत घेऊन भाजपाने ही योजना सुरु केली आहे. दुपारी १२ ते एक या वेळेत ही थाळी सर्वांना दिली जाईल.

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवडा ५ दिलसांचा अन् पगार ७ दिवसांचा – बच्चू कडू

Nav maharashtra news

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदवला आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी ठाकरे सरकारनं मान्य केली आहे. येत्या २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पण सरकारमध्येच मंत्री असलेल्या बच्चू कडू यांना हा निर्णय पटलेला नाही. त्यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवडा पाच दिवसांचा असेल तर, सात दिवसांचा पगार का द्यायचा? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे. चांगले काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा केला तरी चालेल, पण दोन दिवसही व्यवस्थित काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा का करायचा? असे प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केले आहेत. एकप्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. काही कर्मचाऱ्यांच्या टेबलावरुन फायली महिनो न महिने पुढे सरकत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना लाभ का द्याचे? हा त्यांचा मुद्दा आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेतली होती. अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ. सोनाली कदम, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

दिल्लीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना किती मते मिळाली?

Navmaharashtra news

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, तर काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. दिल्ली निवडणुकांच्या रिंगणात राष्ट्रवादीचे पाच उमेदवारही उतरले होते, त्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं.

‘आम आदमी पक्षा’चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या सुरेंद्र सिंह यांना आमदारकी गमवावी लागली आहे. दिल्ली कँटॉन्मेंट या आपल्याच मतदारसंघातून सुरेंद्र सिंह निवडणूक लढवत होते. मात्र इथे ‘आप’चे वीरेंद्रसिंह कडियान विजयी झाले, तर भाजपचे मनिष सिंह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कडियान यांना जवळपास 26 हजार, तर मनिष सिंह यांना अंदाजे 17 हजार मतं मिळाली.

दिल्ली कँटॉन्मेंट मतदारसंघात काँग्रेस उमेदवार तिसऱ्या, तर बसप उमेदवार चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीचे सुरेंद्र सिंह यांना अवघी 854 मतं मिळाली. विद्यमान आमदाराला जनतेने नाकारल्यामुळे उमेदवारापेक्षा पक्षाला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांचे निकाल

गोकुलपूर – सुरेंद्र कुमार (आप) – 88 हजार 90 मतं, रणजीत सिंह (भाजप) 68 हजार 575 मतं, सातव्या क्रमांकावर फतेह सिंह (राष्ट्रवादी) – 418 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 449

बाबरपूर – गोपाल राय (आप) – 58 हजार 827 मतं, नरेश गौर (भाजप) – 35 हजार 564 मतं, सहाव्या क्रमांकावर झाहिद अली (राष्ट्रवादी) – 100 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 211

छत्तरपूर – कर्तार सिंह तन्वर – 66 हजार 451 मतं, ब्रह्म सिंह तन्वर – 663 हजार 13 मतं, आठव्या क्रमांकावर राणा सुजीत सिंह (राष्ट्रवादी) – 171 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 637

मुस्तफाबाद – हाजी युनूस (आप) – 98 हजार 681 मतं, जगदीश प्रधान (भाजप) – 77 हजार 845 मतं, पाचव्या क्रमांकावर मयुर भान 288 मतं, ‘नोटा’ला अधिक मतं – 459

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

Navmaharashtra News

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात १५५.५० रुपयांनी वाढ झाली असून दिल्लीत या सिलिंडरसाठी ८५८.५० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात १४५ रुपयांनी वाढ झाली असून त्यासाठी ८२९.५० रुपाये मोजावे लागणार आहेत. तर कोलकातामध्ये गॅस सिलिंडरच्या दरात १४९ रुपयांनी वाढ झाली असून त्यासाठी ८९६ रुपये मोजावे लागणार आहेत.सिलिंडर दर १४.२ किलो –    ७४९.०० रुपये व १९ किलो –      १५५०.०२ रुपये हे असतील.

दिल्लीत पुन्हा ‘आप’,काँग्रेस साफ

Navmaharashtranews

दिल्ली विधानसभेचे निकाल स्पष्ट झाले असून आम आदमी पक्षानं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. भाजपला मागील वेळेपेक्षा काही जागांवर आघाडी मिळाली आहे परंतू काँग्रेसचा सूपडा मात्र साफ झाला आहे. आपचे अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचा ताज डोक्यावर चढवण्यासाठी सज्ज झालेत. अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानत भष्ट्राचार विरोधी पक्षाला निवडण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. दिल्लीकरांनी त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला असे देखील केजरीवाल यावेळी म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. ‘आप’ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी हे “आतापर्यंतचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे. हा सत्याचा विजय झाला आहे. मूळ प्रश्नांवर राजकारण करायला हवं. राजकीय पक्षांनी यातून शिकलं पाहिजे,” असं म्हटलं आहे

आम आदमी पार्टी : 62

भाजपा : 08

काँग्रेस : 00

केस उगवण्यासाठी लावा हे तेल

केस गळत आहे, टक्कल पडतंय आणि अनेक उपाय करूनही फायदा मिळत नाहीये तर हे तेल आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. याने टक्कल पडलेल्या जागेवरही नवे केस येतील आणि केस दाट होतील. पाहू कसं तयार करायचं हे तेल..हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे ज्या सहजपणे उपलब्ध असतात. 1. लसणाच्या पाकळ्या: 6 ते 72. ताजा चिरलेला आवळा: 2 ते 33. चिरलेला कांदा: 1 लहान4. एरंडेल तेल: 3 चमचे5. नारळाचे तेल: 4 चमचे
ह्या पाची वस्तू मिसळून आपण तेल तयार करू शकता: कृती- सर्वात आधी एका वाटीत नारळाचे तेल आणि एरंडेल तेल मिळवून घ्या. आता यात कापलेला लसूण, कांदा आणि आवळा टाका. हे मिश्रण मंद आचेवर 5 मिनिट शिजवून घ्या. आता आचेवर काढून किमान 1 तास हे मिश्रण असंच राहू घ्या.

हे तेल नियमितपणे केसांना लावल्याने, केसांचे गळणे कमी होईल आणि गळलेल्या केसांमुळे डोक्यावरील त्वचा दिसायला लागलीत असेल तर तिथेही नवे केस येतील. याव्यतिरिक्त केसांमध्ये दाटपणा येईल. तर वेळ करू नका, तयार करा आणि ह्या केसांना नवीन जीवन.

सकाळी उठल्या उठल्या मोबाइल वापरणे घातक

Navmaharashtra News

मोबाइल हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीची अपडेट ही मोबाइलच्या मार्फत मिळते. सकाळी उठल्या उठल्या माणूस स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी मोबाइल हातात घेतो. अशा लोकांची सध्या संख्या वाढत चालली आहे. परंतु दिवसभर या वाईट सवयीमुळे तणाव जाणवतो हेदेखील लक्षात येत असेल. एका संशोधनात अलीकडे असं स्पष्ट झाले आहे की, जे लोक सकाळी उठल्या उठल्या हातात मोबाइल घेतात त्यांना दिवसभर सुरळीत काम करणं कठीण जातं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा सकाळी उठल्यावर आपण मोबाइलमध्ये नोटिफिकेशन बघतो, तेव्हा आपल्या मेंदू त्या विषयावर विचार करू लागतो. त्यामुळे मन इतर कामात लागत नाही, असं केल्यानं  आपल्या कार्यक्षमतेवरदेखील प्रभाव पडतो. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल कळतं मग ती स्वतःशी निगडित असो वा नसो. मग आपण सतत त्याबद्दल विचार करू लागतो. तेव्हा तणाव निर्माण होतो. सकाळी अनेक लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं असेदेखील म्हटलं गेले आहे. अशात अधिक तणावामुळे त्यात भर पडते. यामुळे गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.  सकाळी उठल्यावर जेव्हा आपण ईमेल किंवा नोटिफिकेशन तपासत असतो तेव्हा आपण मागील दिवसांच्या गोष्टी वाचत असतो. ज्यामुळे वर्तामान विसरून भूतकाळात जगू लागतो. यामुळे आपलं मन आणि मेंदू वर्तमान स्थितीत मन लावण्यात अपयशी ठरतं. ज्यामुळे दिवसाची सुरुवातच योग्यरीत्या होत नाही.तज्ज्ञांप्रमाणे सकाळी उठल्यावर फोन वापरणं टाळावं. आपण सकाळी उठल्यावर मेडिटेशन किंवा योगादेखील करू शकता. हे केल्यामुळे मन आणि मेंदूला शांतता लाभेल. ज्यामुळे आपण कार्य चांगल्यारीत्या पार पाडू शकाल.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ५१ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय वादात

Navmaharashtra News

महाराष्ट्र सरकारनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन दिलीय. शरद पवार हे या इन्स्टिट्युटचे विश्वस्त आहेत. शरद पवारांमुळेच सर्व नियम डावलून जमीन देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय.

“वसंतदादा शुगर इन्स्ट्युट संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित आहे. याआधी महसूल, विधी आणि न्याय विभागानं यावर आक्षेप घेतला होता. हे आक्षेप धुडकावत सरकारनं निर्णय घेतला,” असा आरोप भंडारींचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचा हा आरोप फेटाळला आहे. “वसंतदादा इन्स्टिट्युटला भाडेतत्वावर जमीन देण्यात आलीय, शरद पवारांना नाही. साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही संस्था काम करते. याचं राजकारण केलं जाऊ नये,” असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले.

डोंबिवलीत समलिंगी संबंधातून पार्टनरचीच हत्या

Navmaharashtra News

डोंबिवलीत सूटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात उमेश पाटील (५३) यांची समलिंगी संबंधातून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. आरोपी प्रफुल्ल पवार याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने अटक केली. आरोपी प्रफुल्ल पवार आणि मयत उमेश पाटील या दोघांमध्ये समलैंगिक संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. काही दिवसांपूर्वी आरोपी प्रफुल्ल पवार याचा विवाह झाला. प्रफुल्लच्या लग्नानंतरही उमेश त्याच्याकडे संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र प्रफुल्लने नकार दिल्यामुळे ‘तुझ्या बायकोला सगळं सांगेन’ अशी धमकी तो देत होता. प्रफुल्ल आणि उमेश यांच्यामध्ये शारीरिक संबंधांवरुन बुधवारी रात्री जोरदार भांडण झालं. उमेशच्या नेहमीच्या धमक्यांना कंटाळून प्रफुल्लने त्याची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरला. डोंबिवली पश्चिमेतील 52 चाळ परिसरात झुडूपात टाकला होता.