राज्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या ही चिंतनाजनक- शरद पवार

“राज्यातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या ही चिंतनाजनक आहे. लोकांनी सरकारच्या सूचनांचं पालन करावं. आता घराबाहेर पडलात तर संपूर्ण पिढीसला त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. राज्यातील जनतेशी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना मार्गदर्शनही केलं.

“कोणीही आपल्या घराबाहेर पडू नका. मी देखील बरेच दिवस घराबाहेर पडलो नाही. घराबाहेर पडलो तर अख्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील. संकटाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे व्यवस्थाही मोठी करावी लागेल. राज्य सरकार या संकटाशी झटत आहे,” असं पवार यावेळी म्हणाले. तसंच करोनाचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे असंही त्यांनी नमूद केलं.

“काही खासगी डॉक्टरांनी आपली सेवा देणं थांबवलं आहे. हे अतिशय दुखद आहे. कोणीही वैद्यकीय सेवा देण्याचं काम थांबवू नका. आज देशासमोर मोठं आर्थिक संकट आहे. येत्या काळात आपल्याला काटकसरीची सवय करावी लागणार आहे,” असं ते यावेळी म्हणाले. “करोनावर आपण विजय मिळवणारच आहोत,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. “सध्या देशात योग्य प्रमाणात अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. आरोग्य शिबिरं घेण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल,” असं म्हणत सूचनांची अंमलबजावणी करा असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.

राज्यभरात२२११८ खोल्या,५५७०७ खाटांची सोय,प्रशासन सज्ज

कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . या खोल्यांमध्ये जवळपास 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र, गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील 22 हजार 118 खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वसतीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे.”

या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण आणि तात्पुरत्या स्वरुपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा राहुल गांधींना झटका,काँग्रेसला रामराम

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर 19 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही वेळापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सोबत होते. त्यामुळे ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर 19 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. जोतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सहा मंत्र्यांच्या हकालपट्टीची शिफारस राज्यपालांना केली आहे. यामध्ये इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्दुमन सिंह तोमर, डॉ. प्रभुराम चौधरी यांचा समावेश आहे.

Madhyapradesh MLA resign congress party
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचंही कळत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचं कळतंय. राज्यसभेच्या उमेदवारी शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांचा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदही हवं आहे.

कोरोनामुळे शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द


मुंबई : करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शरद पवार यांचा नाशिक दौरा आणि कळवण तालुक्यातील शेतकरी मेळावा रद्द करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये करोनाचे चार संशयित आढळले होते. त्यांची तपासणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्य़ात करोना व्हायरसचे चार संशयित सापडले होते. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची देशातली संख्या ४३ च्या वर पोहचली आहे. शिंक , खोकला येणे यातून करोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेतकरी मेळावा म्हटले की तिथे गर्दी होणे हे स्वाभाविकच. त्यातही त्या मेळाव्यात शरद पवार येणार असतील तर गर्दी होणारच हे सगळे टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यप्रदेशात जोरदार राजकीय हालचाली, कमलनाथ संकटात


मध्य प्रदेशमधील राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर राजकीय संकट ओढावल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील २० मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपला राजीनामा सादर केला आहे. शिवाय कमलनाथ यांना मंत्रिमंडळ पुनर्चनेसाठी मंत्र्यांनी अधिकारही दिले आहेत.

कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याचे दिसत आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होणार का? की पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांचे सरकार येणार आणि ज्योतिरादित्य त्यांना पाठिंबा देणार? या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी काल दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली होती.

मध्यप्रदेश सरकारमधले १७ आमदार हे बंगळुरूला गेले आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये ६ मंत्र्यांचाही समावेश आहे. तसंच हे सगळे सिंधिया यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशात राजकीय भूकंप होणार का? धुळवडीच्या दिवशीच राजकीय रंग उधळले जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. त्यापैकी ११४ जागांसह काँग्रेस सत्तेत आहे. भाजपाच्या १०७ जागा आहे. बसपाच्या २, समाजवादी पक्षाची १ आणि चार अपक्ष आमदार असं सध्याचं राजकीय बलाबल आहे.

पुण्यात आढळले करोनाचे दोन रूग्ण; उपचार सुरू

पुण्यात करोनाचे दोन रूग्ण आढळले असून त्यांच्यावर नायडू रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. संबंधित रूग्णांना नायडू रूग्णालयातील करोना कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांनी २० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबईचा दौरा केला होता.

भारतात परतल्यानंतर त्याच्या सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणं दिसून आली. त्यामुळे ते सोमवारी नायडू रूग्णालायात दाखल झाले. त्यानंतर केलेल्या तपासादरम्यान त्यांच्यापैकी एकाला करोनाची सौम्य लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासही सुरूवात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. तसंच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. नागरिकांनी घबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसंच कोणत्याही ठिकाणी वावरताना वैयक्तिक स्वच्छता पाळावी. तंसंच खोकताना, शिंकताना मास्क ऐवजी, रूमाल वापरावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.

विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग
दरम्यान, ‘करोना व्हायरस’चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावर ‘थर्मल स्क्रिनिंग’ केली जात आहे. त्यांचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे फॉर्म भरून घेतले जात आहेत. दिल्ली विमानतळावर फॉर्मचा तुटवडा असल्याने प्रवाशांना दीड ते दोन तास ‘इमिग्रेशन काऊंटर’वर रांगेत उभे रहावे लागत आहे. करोनाच्या भीतीमुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून पत्ता आणि आजाराची लक्षणे याबाबत एक फॉर्म भरून माहिती गोळा केली जात आहे. परंतु तो भरण्याची प्रवाशांना कल्पना नसल्याने गोंधळ उडतो. मात्र विमानतळावर त्यामुळे भारतीय नागरिकांचा गोंधळ होत आहे. प्रारंभी काही ठराविक देशांमधून आलेल्या प्रवाशांकडूनच असा फॉर्म भरून घेतला जात असे.

यासंदर्भात काठमांडूवरून दिल्लीत आलेले पुण्याचे शिरीश पाठक म्हणाले, दिल्ली विमानतळावर ‘थर्मल’ तपासणीसाठी दोन फॉर्म भरावे लागतात. एका फॉर्मच्या दोन प्रती भराव्या लागत आहेत. पण एअरलाईन्सकडून एकच फॉर्म दिला जातो. हे दोन फॉर्म आरोग्य विभाग आणि इमिग्रेशन केंद्रासाठी हवी असते. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा फॉर्म आणून रांगेत लागावे लागते. त्यानंतर ‘इमिग्रेशन काऊंटर’समोर मोठी रांग लागली होती. तेथे एक तास गेला. तेथे १२ काऊंटर होते, पण चार-पाचच अधिकारी होते. रांगेत लागणाऱ्यांची एवढी गर्दी होती की, येथे करोना विषाणूची बाधा होण्याची भीती होती. याबाबाबत इमिग्रेशन विभाग हतबल दिसून आला. रविवारी गर्दी आणि विलंबामुळे प्रवाशी संतापले आणि घोषणा देऊ लागले.

परदेशी नागरिकांसाठी वेगळे काऊंटर
विमानतळावर परदेशी नागरिकांना वेगळे आणि भारतीयांना वेगळे काऊंटर देण्यात आले आहे. मात्र, फॉर्मबद्दल आगाऊ सूचना न देणे आणि ते पुरेसे उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा वेळ जात आहे. शिवाय इमिग्रेशन केंद्रात परदेशी आणि भारतीय नागरिकांना देखील फॉर्म जमा करावा लागत आहे . यामुळे विमानतळावर गोंधळाची स्थिती आहे, असेही पाठक म्हणाले. दरम्यान, विमान वाहतूक कंपन्यांनी भारतात येणाऱ्या प्रवाशांनी या फॉर्मचे प्रिन्ट काढावे, ते भरून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. कारण, फॉर्मचा तुटवडा आहे, असे म्हटले आहे.