भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर 19 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही वेळापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सोबत होते. त्यामुळे ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर 19 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. जोतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सहा मंत्र्यांच्या हकालपट्टीची शिफारस राज्यपालांना केली आहे. यामध्ये इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्दुमन सिंह तोमर, डॉ. प्रभुराम चौधरी यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचंही कळत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचं कळतंय. राज्यसभेच्या उमेदवारी शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांचा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदही हवं आहे.