शिवभोजन थाळी योजनेचा तालुकास्तरावर विस्तार; किंमत पाच रूपये

Navmaharashtra News
shivbhojan Thali

महाविकास आघाडीच्या सरकारकडून जिल्ह्यांच्या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनाचा विस्तार आता तालुकास्तरावरही करण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे मोठ्या शहरांबरोबरच निमशहरांमध्येही बेघर, गरीब आणि स्थलांतरीत लोकांचे अन्नावाचून हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

शिवभोजन थाळी म्हणजे दहा रुपयांत जेवण अशी योजना आहे. मात्र, राज्यातील लॉकडाउनच्या काळात शहरांमध्ये विविध ठिकाणी अडकून पडलेल्या अनेकांचे जेवणाचे हाल होत असल्याने सध्या ही योजना केवळ ५ रुपयांत जेवण अशी करण्यात आली आहे. याच नव्या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने याद्वारे ५ रुपयांत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

तालुकास्तरावरील निमशहरांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतरांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासकीय सुत्रांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान शिवसेनेकडून सत्तेत आल्यास दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन पाळत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पहिला निर्णय घेतला होता. दरम्यान, सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत शिवभोजन थाळी अनेकांसाठी जीवनदायी ठरली आहे.