राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनंत करमुसे असं या स्थापत्य अभियंत्याचं नाव असून आव्हाड यांच्या पोलीस शरीररक्षकांसह काही जणांनी त्यांच्या बंगल्यात नेऊन मारहाण केल्याचा आरोप त्यानं केला आहे. याबाबत वर्तकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता देशवासीयांना दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर अनंत करमुसे यानं त्यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्याच रात्री दोन गणवेशधारी आणि दोन विना गणवेशातील पोलिसांनी त्याला आव्हाड यांच्या बंगल्यावर नेलं. दरम्यान, त्यानं प्रश्न विचारला असता त्याला आव्हाडांच्या बंगल्यावर नेत असल्याचं सांगण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट करायला लावली. त्यानंतर माफीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची माहिती त्यानं दिली. यानंतर त्यानं वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.