निष्पक्ष व निर्भिड मराठी भाषेत ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा,नवमहाराष्ट्र न्यूज Navmaharashtra News

आम्हाला वेबसाईटवर Follow करा

https://www.navmaharashtranews.com

नवमहाराष्ट्र न्यूज आता सोशल साईट्सवरही उपलब्ध

http://www.facebook.com/navmaharashtranews

http://www.twitter.com/navmahanews

http://www.instagram.com/navmaharashtranews

लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा,नवमहाराष्ट्र न्यूज

जावयाचे सासऱ्यांवर गंभीर आरोप

औरंगाबाद : काहीच दिवसांपूर्वी राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंवर सडकून टीका करतानाचा एक व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी युट्यूबवर टाकला आहे.

‘२००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवलं नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो,’ अशी टीका जाधव यांनी केली आहे.

‘तुम्ही फक्त रागातून माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मला पोलिसांनी हे सांगितलं आहे. मी तुमच्यासोबत बोलायला दिल्लीला आलो, तर तुम्ही मला धमकावलं. माझ्या आईवर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरून तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात. तुम्ही राजकारण करताना घरं भरली, पण आम्ही लोकांचं काम केलं. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवता, तिचा अपमान करता,’ असे आरोप हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवर केले आहेत.

‘माझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवलं. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचं तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मतं कोणी दिली? तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही,’ अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.

‘तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू, पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलंत किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही,’ असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

तुम्हाला तुमच्या मुलीला आमदार करायचं असेल, तर करा, मदत मी करीन, असंही जाधव म्हणाले. तुम्ही मला मदत केली नाही, उलट माझ्या कार्यकर्त्यांकडून १० टक्के घेतल्याचा आरोपही त्यांनी दानवेंवर केला.

‘मला त्रास देऊ नका, मी कन्नडमध्ये येणार सुद्धा नाही. तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या. मी मेटंल हॉस्पिटलमधूनच आलो आहे. मी अंतुर किल्ल्यावर जीव द्यायलाही गेलो होतो. तुम्हाला वाटतं ते करा, तुमच्याकडे अमित शाह आहे, तुम्ही काहीही करू शकता. मी जीव देईन आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील, हे लक्षात ठेवा,’ असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना दिला.

‘मला जगू द्या. मी माझा बंगलासुद्धा देऊन टाकतो. मी आता कोचीनला जात आहे. तुम्ही मला अडकवलं, तर माझ्याजवळ सायनाईडच्या गोळ्या आहेत. तुम्ही लफडी केली तर मी जीव देईन आणि मग तुमचं रेकॉर्डिंग व्हायरल होईल. गुंडगिरीपलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. माझा जीव ज्यादिवशी जाईल, त्यादिवशी तुम्ही उघडे पडले म्हणून समजा,’ असं धक्कादायक विधान हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे.

संबित पात्रा रूग्णालयात दाखल, कोरोनाची लक्षणे दिसल्याने उपचार

Sambit Patra

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘कोरोना’ विषाणूची लक्षणे आढळल्याने संबित पात्रा यांना गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. (BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)

संबित पात्रा हा भाजपचा राष्ट्रीय स्तरावरील चेहरा आहे. भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. बर्‍याचदा ते टीव्हीवर चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसतात.

45 वर्षीय संबित पात्रा हे हिंदूराव रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते. ते ओएनजीसीच्या मंडळावरील संचालकांपैकी एक होते. 2012 मध्ये दिल्लीच्या काश्मिरी गेट विभागातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती, त्यात पात्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ राजकारणात झोकून देण्याचा निर्णय घेतला.

2014 मधील लोकसभा निवडणूकीच्या वेळी पात्रा यांनी भाजपसाठी प्रचार केला. टीव्हीवरील चर्चांमधून त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. भाजपची सत्ता आल्यावर पात्रा हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत पात्रा यांनी ओदिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांना 11,700 मतांनी पराभूत केले.

माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि भाजप नेते तेजिंदर पालसिंग बग्गा यांनी संबित पात्रा यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे ट्वीट केले आहेत. यामध्ये #DefeatCorona असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. (BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)

जाणून घ्या.! शेवग्याच्या शेंगांचे फायदे


शेवगाच्या शेंगांचे आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शेवगाच्या शेगत 300 हून अधिक प्रकारांच्या आजाराचे औषध आहे. दक्षिण भारतात तर ह्याचा वापर दररोजच्या आहारात केला जातो. शेवग्याचा शेंगांमध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, आयरन, मॅग्निशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळतात.

शेवगाच्या शेंगांची कोळी पानं आणि फळे भाजी म्हणून वापरतात. ह्याचा काड्या, हिरवे पानं त्याच बरोबर ह्याचे सुकलेले पान पण औषधीयुक्त असतात. ह्याचा पानाची भाजी खूप चवदार असते. जेवणात ह्याचे सेवन करावे. चला तर मग याचे गुणकारी लाभ जाणून घेऊ या..

◆ पोटाशी निगडित कुठल्याही समस्या अपचन असो किंवा बद्धकोष्ठता असल्यास शेवगाच्या शेंगांचे रस प्या किंवा ह्याची भाजी करून खाल्ल्याने पोटाच्या समस्या नाहीश्या होतात.

◆ नेत्र विकार असल्यास शेवग्याच्या शेंगा, पान, फुले जास्त प्रमाणात वापरावी. दृष्टी कमी झाल्यास लाभ मिळतो.

◆ सायटिका, संधिवात सारखे त्रास असल्यास याचा पानांचा आणि ह्याच्या झाडाच्या सालांचा काढा करून प्यायल्याने हे रोग नाहीसे होतात.

◆ यकृतास निरोगी ठेवण्यास ह्याची भाजी बनवून खाल्ल्यास हे प्रभावी असतात.

◆ शरीरातील कुठल्याही भागात लचक भरलेली असल्यास ह्याची पाने बारीक वाटून घ्यावी आणि त्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळून लावल्याने वेदना आणि सूज कमी होते.

◆ कान दुखण्यावरही हे प्रभावी आहे. ह्याचा पानाचा रस काढून कानात थेंब टाकल्याने कानदुखीच्या वेदना पासून आराम मिळतो.

◆ मूत्रपिंडाच्या किंवा किडनीच्या स्टोन झाल्यास शेवगाच्या शेंगांची भाजी किंवा सूप करून प्यायलाने स्टोन निघून जातो

रक्तदाब, हृदयरोगावर फायदेशीर आहे. शरीरातील रक्तदाब आणि कॉलेस्ट्राल कमी करते. वजन वाढल्यास वजन कमी करते. ह्यात कॅल्शियम भरपूर असतात त्यामुळे हाडं बळकट होतात.

◆लहान मुलांना जंत होण्याची समस्या जास्त असते. असे झाल्यास ह्यांचा पानांचा रस द्यावा आराम होतो.
◆ अतिसार झाल्यास देखील पानांचा रस देणे लाभकारी असतं.

◆ शेवगाच्या शेंगा ब्लड प्युरिफायर म्हणून काम करते. ह्याचे सूप किंवा भाजी बनवून खाल्ल्यास कँसर सारख्या आजारामध्ये पण लाभकारी आहे.

बघा ह्या शेवगाच्या शेंगा किती गुणकारी आणि प्रभावी आहे. त्याचे पानं, फुल, झाडाची सालं सगळंच काही औषधी असतं मग आता आपण ह्याचा आपल्या आहारात समावेश करू या आणि शरीरास निरोगी ठेवू या.

HTML

var aax_size=’300×250′;
var aax_pubname = ‘navmaharashtr-21’;
var aax_src=’302′;

http://c.amazon-adsystem.com/aax2/assoc.js

परप्रांतीय मजूरांना लुटणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Corrupt Police

सांगली : कडेगांव एम आय डी सी येथील जिल्हा सीमेवर कडेगांव पोलिस ठाणे येथील पोलिस हवालदार संतोष वसंतराव पाटील गोरगरीब आणि परप्रांतीय लोकांना विनाकारण मारहाण करून मजुरांना लुटत होता. त्याच्यावर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

परप्रांतीय मजूर चालत, मोटरसायकल,खासगी गाडीने आपल्या गावी जात आहेत त्यासाठी ते परवानगी घेऊन जात आहेत अशा मजूरांना जिल्हा सिमेवर अडवून त्यांना मारहाण करून त्याच्याजवळचे पैसे हिसकावून घेणारा भ्रष्ट पोलिस कर्मचारी संतोष पाटील याच्याबद्दल अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यासंबंधी अधीक्षकांनी कडेगाव पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांच्याकडे अहवाल मागितला होता.दरम्यान याची दखल घेत पाटील याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

लाँकडाऊन मध्ये काही भ्रष्ट कर्मचारी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्या व्यापारी व नागरिकांना लुटण्याचा धंदा तेजीत होता, अवैध व्यवसाय हप्तेवसूलीवर खुलेआम सूरु आहेत अशातच पोलिसावर झालेल्या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक दादा सामंत (वय ९१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि ऋता, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सामंत हे दिवंगत प्रसिद्ध कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे ज्येष्ठ बंधू होत. सामंत हे अनेक वर्षे ग्वाल्हेर येथील गिरणीत कामाला होते. मुंबईत सन १९८१मध्ये झालेल्या ऐतिहासिक गिरणी संपात ती नोकरी सोडून ते मुंबईस परतले व डॉ. दत्ता सामंत यांच्यासोबत त्यांनी कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होत.

11 लाख शेतकरी खातेदारांसाठी खरीप हंगामास 8 हजार कोटीची शासनाची हमी

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11 लाख शेतकरी खातेदारांसाठी खरीप हंगामास 8 हजार कोटीची शासनाची हमी
– सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

Navmaharashtra News

सातारा : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.
ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने कोरोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामध्ये राज्य सहकारी बँकेच्यावतीने आणि काही बँका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यातमध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे. जवळजवळ साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे 8 हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
00000

सातारा जिल्ह्यात नवे 31 कोरोना बाधित

सातारा जिल्ह्यात नवे 31 कोरोना बाधित;पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही त्यात समावेश

Navmaharashtra News

सातारा दि. 23 (जिमाका): सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 31 जण कोरोना ( कोविड 19 ) बाधित असून यात मुंबई येथून आलेली आणि पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही समावेश असून 80 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील निकट सहवासित 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगा, वय 11, 34 19 वर्षीय 3 महिला, शेणाली येथील मुंबईवरुन आलेले 60 व 50 वर्षीय 2 पुरुष व 35 वर्षीय महिला.
जावली तालुक्यातील गवडी येथील निकटवासित 32 वर्षीय पुरुष, ठाणे येथून आलेले कसबे बामणोली येथील 23 व 14 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली सायगाव येथील 58 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 29 वर्षीय महिला, 10 वर्षाचे बालक व 50 वर्षीय पुरुष, अंधोरी येथील सारीचा 43 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील मुंबई येथून आलेली पाचगणी येथील 70 वर्षीय महिला (मृत).
वाई तालुक्यातील मुंबई येथून आलेली वाई येथील 48 वर्षीय महिला, मुंबई येथुन आलेला देगाव येथील 60 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील चिंचणेर-लिंब येथील निकटसहवासित 43 वर्षीय पुरुष, कुस खुर्द येथील 76 व 43 वर्षीय 2 महिला व 17 वर्षीय युवती.
खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 28 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, मांजरवाडी येथील 47 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला चिंचणी येथील 21 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली खतगूण येथील 20 वर्षीय महिला.
कोरेगाव तालुक्यातील मुंबई येथून आलेला वाघोली येथील सारीचा 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला.
000

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, : कोविड-19, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 23 मे 2020 रोजीचे 1200 वाजल्यापासून ते दिनांक 07 जून 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे. मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 23 मे 2020 रोजीच्या 1200 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 7 जून 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
00000

देहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय

देहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय
– जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, – देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील,योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे,संजय मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणा-या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोशल डिस्टसिंग’ बाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत, आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या
प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.