भाजपाने विधानपरिषदेचा चौथा उमेदवार बदलला

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार बनले आहेत.

भाजपकडून 8 मे रोजीच विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्यांनी उमेदवारी अर्जही भरले होते. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी आहे. परंतु विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून रमेश कराड यांनीही अर्ज भरल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पक्षाने जाहीर केलेल्यांपैकी एकाचा पत्ता कट होऊन रमेश कराड यांची वर्णी लागेल, असा अंदाजही वर्तवला जात होता. हीच शक्यता खरी ठरत रमेश कराड आता भाजपचे अधिकृत उमेदवार बनले आहेत.