ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

ज्येष्ठ कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक दादा सामंत (वय ९१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि ऋता, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सामंत हे दिवंगत प्रसिद्ध कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे ज्येष्ठ बंधू होत. सामंत हे अनेक वर्षे ग्वाल्हेर येथील गिरणीत कामाला होते. मुंबईत सन १९८१मध्ये झालेल्या ऐतिहासिक गिरणी संपात ती नोकरी सोडून ते मुंबईस परतले व डॉ. दत्ता सामंत यांच्यासोबत त्यांनी कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होत.

11 लाख शेतकरी खातेदारांसाठी खरीप हंगामास 8 हजार कोटीची शासनाची हमी

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11 लाख शेतकरी खातेदारांसाठी खरीप हंगामास 8 हजार कोटीची शासनाची हमी
– सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

Navmaharashtra News

सातारा : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.
ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने कोरोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामध्ये राज्य सहकारी बँकेच्यावतीने आणि काही बँका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यातमध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे. जवळजवळ साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे 8 हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
00000

सातारा जिल्ह्यात नवे 31 कोरोना बाधित

सातारा जिल्ह्यात नवे 31 कोरोना बाधित;पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही त्यात समावेश

Navmaharashtra News

सातारा दि. 23 (जिमाका): सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 31 जण कोरोना ( कोविड 19 ) बाधित असून यात मुंबई येथून आलेली आणि पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही समावेश असून 80 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील निकट सहवासित 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगा, वय 11, 34 19 वर्षीय 3 महिला, शेणाली येथील मुंबईवरुन आलेले 60 व 50 वर्षीय 2 पुरुष व 35 वर्षीय महिला.
जावली तालुक्यातील गवडी येथील निकटवासित 32 वर्षीय पुरुष, ठाणे येथून आलेले कसबे बामणोली येथील 23 व 14 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली सायगाव येथील 58 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 29 वर्षीय महिला, 10 वर्षाचे बालक व 50 वर्षीय पुरुष, अंधोरी येथील सारीचा 43 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील मुंबई येथून आलेली पाचगणी येथील 70 वर्षीय महिला (मृत).
वाई तालुक्यातील मुंबई येथून आलेली वाई येथील 48 वर्षीय महिला, मुंबई येथुन आलेला देगाव येथील 60 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील चिंचणेर-लिंब येथील निकटसहवासित 43 वर्षीय पुरुष, कुस खुर्द येथील 76 व 43 वर्षीय 2 महिला व 17 वर्षीय युवती.
खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 28 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, मांजरवाडी येथील 47 वर्षीय महिला, मुंबई येथून आलेला चिंचणी येथील 21 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली खतगूण येथील 20 वर्षीय महिला.
कोरेगाव तालुक्यातील मुंबई येथून आलेला वाघोली येथील सारीचा 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला.
000

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, : कोविड-19, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 23 मे 2020 रोजीचे 1200 वाजल्यापासून ते दिनांक 07 जून 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे. मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 23 मे 2020 रोजीच्या 1200 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 7 जून 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
00000