निष्पक्ष व निर्भिड मराठी भाषेत ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा,नवमहाराष्ट्र न्यूज Navmaharashtra News

आम्हाला वेबसाईटवर Follow करा

https://www.navmaharashtranews.com

नवमहाराष्ट्र न्यूज आता सोशल साईट्सवरही उपलब्ध

http://www.facebook.com/navmaharashtranews

http://www.twitter.com/navmahanews

http://www.instagram.com/navmaharashtranews

लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा,नवमहाराष्ट्र न्यूज

जावयाचे सासऱ्यांवर गंभीर आरोप

औरंगाबाद : काहीच दिवसांपूर्वी राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंवर सडकून टीका करतानाचा एक व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी युट्यूबवर टाकला आहे.

‘२००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवलं नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो,’ अशी टीका जाधव यांनी केली आहे.

‘तुम्ही फक्त रागातून माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मला पोलिसांनी हे सांगितलं आहे. मी तुमच्यासोबत बोलायला दिल्लीला आलो, तर तुम्ही मला धमकावलं. माझ्या आईवर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरून तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात. तुम्ही राजकारण करताना घरं भरली, पण आम्ही लोकांचं काम केलं. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवता, तिचा अपमान करता,’ असे आरोप हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवर केले आहेत.

‘माझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवलं. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचं तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मतं कोणी दिली? तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही,’ अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.

‘तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू, पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलंत किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही,’ असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

तुम्हाला तुमच्या मुलीला आमदार करायचं असेल, तर करा, मदत मी करीन, असंही जाधव म्हणाले. तुम्ही मला मदत केली नाही, उलट माझ्या कार्यकर्त्यांकडून १० टक्के घेतल्याचा आरोपही त्यांनी दानवेंवर केला.

‘मला त्रास देऊ नका, मी कन्नडमध्ये येणार सुद्धा नाही. तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या. मी मेटंल हॉस्पिटलमधूनच आलो आहे. मी अंतुर किल्ल्यावर जीव द्यायलाही गेलो होतो. तुम्हाला वाटतं ते करा, तुमच्याकडे अमित शाह आहे, तुम्ही काहीही करू शकता. मी जीव देईन आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील, हे लक्षात ठेवा,’ असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना दिला.

‘मला जगू द्या. मी माझा बंगलासुद्धा देऊन टाकतो. मी आता कोचीनला जात आहे. तुम्ही मला अडकवलं, तर माझ्याजवळ सायनाईडच्या गोळ्या आहेत. तुम्ही लफडी केली तर मी जीव देईन आणि मग तुमचं रेकॉर्डिंग व्हायरल होईल. गुंडगिरीपलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. माझा जीव ज्यादिवशी जाईल, त्यादिवशी तुम्ही उघडे पडले म्हणून समजा,’ असं धक्कादायक विधान हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे.