भाजपाचे राम शिंदे बसलेत उपोषणाला,कारण…

अहमदनगर: कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने राम शिंदे यांनी उपोषण सुरू केले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ मीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्री माथ्यावर कुकडी नदीचा उगम झाला आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात तिचा उगम झाल्यानंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत-वाहत घोडनदीला मिळते

दरम्यान, कुकडीचे पाणी हे शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील धरणातून जाते. मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात मिळणारं हक्काच पाणी अद्याप मिळाले नाही.

उन्हाळा संपत आला तरी पाणी नाही. उन्हाळात पाणी मिळणे गरजेचे होते. पाणी असूनही सोडण्याबाबत कोणतेही नियोजन होत नाही. राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच प्रशासनाकडून देखील कसलाही संपर्क होत नसल्याने भाजपा नेते तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.
कर्जत-जामखेड हे तालुके दुष्काळी भागात असल्याने या तालुक्याला कायम पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. राजकारणी मंडळी प्रत्येक निवडणुकीत याच कुकडीच्या पाण्यावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. शेवटी निवडणुका संपल्या कीं या तालुक्यातील जनतेला पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागते हे देखील तितकेच खरे आहे.
महाविकास आघाडीचे किंग मेकर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील याचं कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याचं राजकारण करत तालुक्यातील नागरिकांना आशेचा किरणं दाखविला. नागरिकांनी देखील नवा युवा चेहरा आपल्यासाठी जीवाचं रान करेल या आशेवर रोहित पवार यांना भरघोस मतांनी विजयी केले. पवारांनी देखील निवडूक प्रचारादरम्यान या तालुक्यात भासलेली पाण्याची तहान टँकरद्वारे भागविली आणि बारामती पॅटर्न वापरत भाजपाच्या नेत्याला धोबीपछाड देत कर्जत-जामखेड मतदारसंघ काबीज केला.
मात्र, आता पुन्हा कुकडीच्या पाण्यावरून राजकारण सुरू झालं असल्याने कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदेकरांना त्यांना हक्काचे पाणी मिळणारं तरी कधी? हाच प्रश्न आता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.