SSC Result 2020: दहावीचा निकाल उद्या जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (२९ जुलै २०२०) रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल mahresult.nic.in.या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे. दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेत एक वेगळीच घटना घडली. यावेळी कोरोना साथीमुळे शेवटचा पेपर रद्द करावा लागला. पण त्यामुळे या पेपरचे गुण नेमके मिळणार कसे? याबाबत विद्यार्थ्यांना चिंता लागून राहिली होती. मात्र आता याबाबत काही नेमके संकेत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या जीव भांड्यात पडला आहे. दहावीची परीक्षा ३ मार्च २०२० ला सुरू झाली होती. यादरम्यानच कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २३ मार्चला होणारा भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला होता.

रद्द झालेल्या पेपरचे असे मिळणार गुण

दरम्यान, केवळ भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने शिक्षण मंडळ विद्यार्थ्याला इतर पेपरमधील गुणांच्या सरासरीनुसार भूगोलाचे मार्क दिले जाणार आहेत. रद्द झालेल्या पेपरबाबतचे नोटीस MSBSHSEकडून जाहीर करण्यात आली होती. तसेच ९ आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने घेतला आहे.

दरम्यान, दहावीचा निकाल (SSC result 2020 Date) उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीचा निकाल उशिराने लागत आहे. एरव्ही बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच निकाल लांबणीवर पडले आहेत. महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असून विद्यार्थी http://www.maharashtraeducation.com आणि http://www.examresults.net/maharashtra या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. यात विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर ते ऑनलाईन निकाल पाहू शकतील.

११वी ऑनलाईनचे प्रवेश वेळापत्रक

  • २२ जुलै – २२ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे
  • २४ जुलै – च्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेल्या माहितीची विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून ऑनलाईन पडताळणी
  • २६ जुलैपासून – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरूवात. विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करु शकतात. सुरूवातीला अर्जाचा पहिला भाग भरणे आणि मार्गदर्शन केंद्र निवडणे.
  • २७ जुलैपासून – अर्जाची तपासणी आणि व्हेरिफिकेशन
  • अर्जाचा दुसरा भाग दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर भरावा लागेल.

Amit Deshmukh विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको !


राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतू सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत.

प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.

अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे, असे महत्वाचे निर्देश अमित देशमुख यांनी यावेळी दिले आहेत.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.

Udayanraje Bhosale छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, जे घडलं नाही, त्याचा बाऊ करू नका

सातारा: राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही, असं सांगतानाच महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच खासदारकीचा राजीनामा दिला असता, असं भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, जे घडलं नाही, त्याचा बाऊ करू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं.
उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्याला आक्षेप घेत उदयनराजेंना समज दिली. त्यावरून राजकारण रंगलेल्याने उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकारण करणाऱ्यांना फटकारले. मी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्याने आक्षेप घेतला. त्यावर अध्यक्षांनी हे कुणाचं घर नाही. हे चेम्बर असून त्याचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं रेकॉर्डवर येणार नाही. यापुढे या गोष्टींचं भान ठेवा, असं नायडू यांनी सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते राज्य घटनेला धरून होतं. राज्यघटनेनुसार त्यांना कामकाज करावं लागतं म्हणून त्यांनी त्यानुसार सांगितलं. त्यात काही चुकीचं नाही. त्यात अवमान होण्यासारखंही काही नाही. उलट त्यांनी मला नव्हे तर माझ्या घोषणेला आक्षेप घेणाऱ्याला नायडूंनी रोखलं, असा दावा करतानाच मात्र, नॉन इश्यूचा इश्यू बनवून काही लोक राजकारण करत आहेत. विनाकारण वादाला जन्म देत आहेत, असं सांगतानाच महाराजाचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का? माझा स्वभाव पाहून तुम्हाला असं वाटतं का? मी तिथेच राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो, असंही उदयनराजेंनी सांगितलं. नायडूंनी काही चुकीची भूमिका घेतली असती तर त्यांनी माफी मागावी म्हणून मीच मागणी केली असती. पण ते चुकलेत असं मला वाटत नाही, असंही ते म्हणाले.

शरद पवारांना विचारा

सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही होते. तुम्ही त्यांना विचारू शकता असं काही घडलं का? तेही सांगतील. मी पवारांसोबत काम केलं आहे. त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केलयं. कालही वेगळं काही घडलं असतं तर त्यांनी मला त्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितली असती. पण काही घडलंच नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

आक्षेप घेणार्यांचा राजीनामा मागा

महाराजांच्या अवमानाचा निषेध म्हणून उदयनराजेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत असल्याचं त्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी माझ्याच राजीनाम्याच्या तुम्ही मागे का लागलाय? असा मिश्किल सवाल केला. काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणेला आक्षेप घेतला. त्याचाच राजीनामा घ्या. माझा राजीनामा का घेता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आहे. त्याच काँग्रेसच्या सदस्याने घोषणेला आक्षेप घेतला, ते कसं चालतं? असा सवालही त्यांनी केला.

नवनिर्वाचित आमदार पडळकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न

आज सकाळपासून एक फोटो वायरल होत आहे…,ज्यात लोकमान्य टिळक यांचा फोटो वापरलेला आहे आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीचा उल्लेख करण्यात आला आहे,यात अभिवादन म्हणून आमदार गोपीचंद पडळकर हे दाखवण्यात आले आहेत.आणि तो फोटो समाजमाध्यमात प्रसारित करून पडळकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे कि,हा फोटो कुठेहि गोपीचंद पडळकर यांच्या ऑफिशिअल अकाउंट वरून पोस्ट करण्यात आलेला नाही.

एका मराठी वेबपोर्टलवर यासंदर्भात बातमी छापण्यात आली आहे,याठिकाणी दोन्ही फोटो देत आहोत.

Original

Edited

अनिल सुर्यवंशी (आ.गोपीचंद पडळकर कार्यकर्ते)

हा फोटो परभणी येथे ग्राफिक्स करण्यात आला आहे आमदार गोपीचंद पडळकर हे राहायला सांगलीला आणि फोटो परभणीतून कसा काय ग्राफिक्स करण्यात आला आहेआणि म्हणूनच आमचं अस ठाम म्हणणं आहे कि काहि विरोधातील विघ्नसंतोषी लोकांनी पडळकर साहेबाना अडचणीत आणण्यासाठी हि उठाठेव केलेली आहे .

काँग्रेसच्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर

Jayshree Patil जयश्रीताई पाटील

सांगली : काँग्रेस नेत्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. जयश्री पाटील या माजी मंत्री दिवंगत मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.

जयश्री पाटील यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सांगली महापालिका, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेमध्येही राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मंत्री विश्वजित पतंगराव कदम आणि युवा नेते विशाल प्रकाशबापू पाटील असे दोन गट आहेत. प्रत्येक निवडणुकीत हे दोन गट कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने परस्परविरोधी काम करतात, असे म्हटले जाते.

दुसरीकडे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. पृथ्वीराज पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं पाठबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मदनभाऊ पाटील गट अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. भाजपसारख्या अन्य पक्षांकडे हे कार्यकर्ते जाण्याअगोदर त्यांना राष्ट्रवादीत घेऊन मोठी राजकीय खेळी राष्ट्रवादी करत असल्याचंही बोललं जातं आहे.

राष्ट्रवादीत गेलेले ‘ते’ ५ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

मुंबई (प्रतिनिधी) : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी महाविकास आघाडीमध्ये मोठा पेचप्रसंग उभा केला होता. काही दिवसांपूर्वी थेट बारामती गाठत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या जिव्हारी लागले होते. अखेर दोन दिवसांच्या शरद पवार, अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करत हा पेच सोडविला आहे. अखेर अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे बुधवारी सोपविल्यानंतर दोन पक्षांतील अंतर्गत तूर्त पडदा पदल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर कामाला लागले. राष्ट्रवादीत गेलेले ते पाच नगरसेवक बुधवारी स्वगृही परतले आहेत.

मी ओबीसी म्हणून आरोपीच्या पिंज-यात :विजय वडेट्टीवार

मी ओबीसी म्हणून आरोपीच्या पिंज-यात : वडेट्टीवार

मी सारथीसाठी प्रामाणिक काम करतोय. मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंज-यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहेह्व अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, त्यांनी सांगितले की, सारथी संस्था बंद पडणार नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो. पण यामागे राजकीय मंडळी या मंडळींना चिथावणी देत आहेत. त्यांची नावे योग्यवेळी जाहीर करेन, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. आमच्या सरकारला केवळ ६ महिने झाले आहेत. मात्र चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनामध्ये गेले. सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निधीचा तुटवडा आहे. पण हा निधी मागे-पुढे होईल, मात्र सारथी बंद पाडणार नाही. सारथीसाठी थोडासा वेळ लागणार आहे. सर्व बंद असताना केवळ एकच सारथीची भूमिका लावून धरणं योग्य नाही, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.


सारथी संस्थेचा विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा-मराठा क्रांती मोर्चा

सारथी संस्थेचा विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा-मराठा क्रांती मोर्चा

पुणे : मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मराठा क्रांती मोर्चाचे तुषार काकडे यांनी सांगितले की, मागील सरकारने आमच्या ब-यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता, तो सरकारने पाळावा.

याशिवाय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. वडेट्टीवार या खात्याला न्याय देऊ शकत नाहीत. सारथी संस्थेची छळवणूक सुरु आहे. वडेट्टीवार यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेदभाव केला जात आहे, असा आरोपही यावेळी केला. वडेट्टीवार यांच्याकडून कार्यभार काढून दुस-या कार्यक्षम मंत्र्यांकडे कार्यभार दिला जावा, अशी मागणी यावेळी मराठा मोर्चाकडून करण्यात आली. तसेच मराठा क्रांती मोर्चा वडेट्टीवार यांचा निषेध करत आहे. मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निकालात काही दगाफटका झाला तर आम्ही सरकारला धडा शिकवू, आंदोलनाची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा यावेळी देण्यात आला.

काही दगाफटका झाला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल, विजय वडेट्टीवार यांनी याला राजकीय रंग देऊ नये, असा आक्रमक पवित्रा मराठा मोर्चाने घेतला.