सारथी संस्थेचा विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा-मराठा क्रांती मोर्चा

पुणे : मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मराठा क्रांती मोर्चाचे तुषार काकडे यांनी सांगितले की, मागील सरकारने आमच्या ब-यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता, तो सरकारने पाळावा.

याशिवाय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. वडेट्टीवार या खात्याला न्याय देऊ शकत नाहीत. सारथी संस्थेची छळवणूक सुरु आहे. वडेट्टीवार यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेदभाव केला जात आहे, असा आरोपही यावेळी केला. वडेट्टीवार यांच्याकडून कार्यभार काढून दुस-या कार्यक्षम मंत्र्यांकडे कार्यभार दिला जावा, अशी मागणी यावेळी मराठा मोर्चाकडून करण्यात आली. तसेच मराठा क्रांती मोर्चा वडेट्टीवार यांचा निषेध करत आहे. मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निकालात काही दगाफटका झाला तर आम्ही सरकारला धडा शिकवू, आंदोलनाची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा यावेळी देण्यात आला.

काही दगाफटका झाला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल, विजय वडेट्टीवार यांनी याला राजकीय रंग देऊ नये, असा आक्रमक पवित्रा मराठा मोर्चाने घेतला.