सुनिल गावसकरांनी ‘विराट-अनुष्का’वर केलेल्या वक्तव्याने वाद

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात बंगळुरू आणि पंजाब या दोन संघांमध्ये खेळल्या मधील सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराट कोहलीवर टीका केली.गावसकर यांनी टीका करताना यामध्ये त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचाही उल्लेख केला. पंजाबविरोधातील सामन्यात विराटची सुमार कामगिरी पाहून गावस्कर यांनी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं.
गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं संतप्त शब्दात यावर आपली प्रतिक्रिया दिली. अनुष्काने गावस्कर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा असल्याचं म्हटलं आहे. पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्न उपस्थित करताना अनुष्काने म्हटलं आहे की, “खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?”
फक्त अनुष्काच नव्हे, तर गावसकरांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विराट कोहली आणि अनुष्काचे चाहते चांगलेच भडकले. नेटकऱ्यांनी तर गावसकरांना धारेवर धरत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. इतकंच नव्हे तर, त्यांच्याकडून समालोचनाची जबाबदारी काढून घेण्याचीही मागणी केली.