उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील ‘कोरोना’ प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील ‘कोरोना’

प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या

-उपमुख्यमंत्री अजित पवार

Navmaharashtra News

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हीडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
कोरोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा सुरू केली आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ‘कोरोना’च्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमातून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे,क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
***

…त्यांनी घराच्या छतावरून भरले पीक विम्याचे अर्ज

वाशिम : सध्याचं जग हे डिजीटल जग आहे. केंद्र सरकारनेही डिजीटल इंडिया मार्फत अनेक महत्वाच्या गोष्टी इंटरनेटद्वारे सोप्या करण्याची सुरुवात केली आहे. कॉलेजचा प्रवेश, एखाद्या योजनेचे फॉर्म, बँकेची कामं आजकाल इंटरनेट द्वारे होतात. लोकांना अधिक डिजीटल साक्षर करण्याचा सरकारचा हेतू आहे. यासाठी भारताच्या गावा-गावात इंटरनेट सुविधा पुरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गावांनी प्रगती करत आपलं नाव जगाच्या नकाशावर झळकवल्याच्या बातम्याही आपण अनेकदा पाहिल्या असतील. परंतू आजही भारतात इंटरनेटचा स्पीड हा नेहमी चर्चेत असणारा मुद्दा असतो.

ग्रामीण भाग सोडा शहरातही काही भागांमध्ये ग्राहकांना इंटरनेट स्पीडची समस्या येते. मात्र वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील येवता गावात CSC केंद्रात काम करणाऱ्या गजानन देशमुख यांनी एक शक्कल लढवली. शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज भरताना इंटरनेट स्पीडचा त्रास होत होता. यासाठी देशमुख यांनी घराच्या छतावर स्पीड चांगला येतो, म्हणून थेट छतावर खुर्ची आणि लॅपटॉपची सोय करत शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज भरले. देशमुख यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. All India Radio News Pune च्या फेसबूक अकाऊंटवरही हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

अनेकदा अधिकारी वर्ग काम करत नाही अशी सर्वसामान्य जनतेची ओरड असते. बहुतांश वेळा ही बाब खरी असली तरीही इंटरनेट स्पीडचं कारण न देता मिळेल त्या परिस्थितीत शेतकऱ्यांचं काम करण्यासाठी छतावर चढून अर्ज भरणाऱ्या गजानन देशमुख यांचं कौतुक व्हायलाच हवं.

Gopichand Padalkar: राष्ट्रवादीचा गृहमंत्री होतो तेव्हा अत्याचार वाढतात

राष्ट्रवादीचा गृहमंत्री होतो तेव्हा अत्याचार वाढतात – आ.गोपीचंद पडळकर

सोलापूर: राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होतो तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात, असे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाळवणी गावात मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणुन त्याच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती.

त्या पीडित व्यक्तीची पडळकर यांनी बुधवारी भेट घेतली. आंतरजातीय प्रेमविवाहातून जरी हा प्रकार झाला असला तरी याला कोणीही जातीय रंग देऊन जातीय तेढ निर्माण होईल अस कृत्य करू नका असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले. पण त्याचवेळी “राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होतो तेव्हा तेव्हा राज्यात अन्याय अत्याचार वाढतात,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना महाराष्ट्राचा कोरोना म्हटले होते. त्यावरुन राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात निदर्शनेही केली होती. आता पुन्हा एकदा पडळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

SSC Result 2020: दहावीचा निकाल उद्या जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (२९ जुलै २०२०) रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल mahresult.nic.in.या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे. दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेत एक वेगळीच घटना घडली. यावेळी कोरोना साथीमुळे शेवटचा पेपर रद्द करावा लागला. पण त्यामुळे या पेपरचे गुण नेमके मिळणार कसे? याबाबत विद्यार्थ्यांना चिंता लागून राहिली होती. मात्र आता याबाबत काही नेमके संकेत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या जीव भांड्यात पडला आहे. दहावीची परीक्षा ३ मार्च २०२० ला सुरू झाली होती. यादरम्यानच कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २३ मार्चला होणारा भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला होता.

रद्द झालेल्या पेपरचे असे मिळणार गुण

दरम्यान, केवळ भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने शिक्षण मंडळ विद्यार्थ्याला इतर पेपरमधील गुणांच्या सरासरीनुसार भूगोलाचे मार्क दिले जाणार आहेत. रद्द झालेल्या पेपरबाबतचे नोटीस MSBSHSEकडून जाहीर करण्यात आली होती. तसेच ९ आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने घेतला आहे.

दरम्यान, दहावीचा निकाल (SSC result 2020 Date) उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीचा निकाल उशिराने लागत आहे. एरव्ही बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच निकाल लांबणीवर पडले आहेत. महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असून विद्यार्थी http://www.maharashtraeducation.com आणि http://www.examresults.net/maharashtra या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. यात विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर ते ऑनलाईन निकाल पाहू शकतील.

११वी ऑनलाईनचे प्रवेश वेळापत्रक

  • २२ जुलै – २२ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे
  • २४ जुलै – च्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेल्या माहितीची विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून ऑनलाईन पडताळणी
  • २६ जुलैपासून – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरूवात. विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करु शकतात. सुरूवातीला अर्जाचा पहिला भाग भरणे आणि मार्गदर्शन केंद्र निवडणे.
  • २७ जुलैपासून – अर्जाची तपासणी आणि व्हेरिफिकेशन
  • अर्जाचा दुसरा भाग दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर भरावा लागेल.

राष्ट्रवादीत गेलेले ‘ते’ ५ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

मुंबई (प्रतिनिधी) : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी महाविकास आघाडीमध्ये मोठा पेचप्रसंग उभा केला होता. काही दिवसांपूर्वी थेट बारामती गाठत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या जिव्हारी लागले होते. अखेर दोन दिवसांच्या शरद पवार, अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करत हा पेच सोडविला आहे. अखेर अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे बुधवारी सोपविल्यानंतर दोन पक्षांतील अंतर्गत तूर्त पडदा पदल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर कामाला लागले. राष्ट्रवादीत गेलेले ते पाच नगरसेवक बुधवारी स्वगृही परतले आहेत.

पडळकर समर्थक विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात सोशल मीडिया युद्ध

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्राला लागलेला कोरोना अशी जोरदार टीका केली आणि काही वेळातच याचे पडसाद सोशल मिडियावर उमटायला लागली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी माध्यमांतर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे त्यामध्ये नामदार जितेंद्र आव्हाड, नामदार धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, रूपाली चाकणकर यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे आणि पडळकरांनी भान ठेवून बोलावे असा सल्ला दिला आहे त्याचबरोबर युवक राष्ट्रवादीने आमदार गोपीचंद पडळकरांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही, तोंडाला काळ फासण्याचा इशारा दिला आहे यावर पडळकर समर्थकही चांगलेच आक्रमक झाले आहेत जर गोपीचंद पडळकर यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रातील तरुण व बहुजन समाज शांत बसणार नाही.

पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठिकठिकाणी निषेध केला जात आहे तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहन केले जात आहे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पडळकरांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

धक्कादायक घटना! दोन वृद्ध भावांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय,एका आरोपीचे वय ६७ वर्षे असून दुसऱ्या आरोपीचे वय ६५ वर्षे आहे. सविस्तर माहिती अशी की शिवाजीनगर गावात शेजारी राहायला असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन ऊसाच्या शेतात आणि पत्र्याच्या शेडमध्ये बलात्कार केल्याची घटना घडलीय. पिडीत मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात, मुलीने बाबतची घटना घरी सांगितली असता आईवडिलांनी कडेगाव पोलीस ठाणे गाठले व सदर पुरूषांवर तक्रार दाखल केली,त्या दोन आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे व आरोपींना अटक करण्यात आली आहे, या घटनेने जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे.

कोरोना योध्द्यांना मिळणार ५०लाखांचा विमा संरक्षण

मुंबई : कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरु आहे.आता कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा शासननिर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमत्री अजित पवार यांनी दिली.

विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, बाह्यस्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारीवर्गाला ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणार्‍या संबंधित कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचे सर्व्हेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करुन कर्तव्य बजावत आहे. या कर्मचार्‍यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत राज्य शासन गंभीर असून त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आलाय, असे ते म्हणालेत.
आरोग्य सेवेच्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारच्या केंद्रीय योजनेचा लाभ आधीपासून मिळत आला आहे. शुक्रवारच्या शासन निर्णयानुसार, कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी आदी सर्व घटकांना ५० लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

भाजपाचे राम शिंदे बसलेत उपोषणाला,कारण…

अहमदनगर: कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने राम शिंदे यांनी उपोषण सुरू केले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ मीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्री माथ्यावर कुकडी नदीचा उगम झाला आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात तिचा उगम झाल्यानंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत-वाहत घोडनदीला मिळते

दरम्यान, कुकडीचे पाणी हे शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील धरणातून जाते. मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात मिळणारं हक्काच पाणी अद्याप मिळाले नाही.

उन्हाळा संपत आला तरी पाणी नाही. उन्हाळात पाणी मिळणे गरजेचे होते. पाणी असूनही सोडण्याबाबत कोणतेही नियोजन होत नाही. राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच प्रशासनाकडून देखील कसलाही संपर्क होत नसल्याने भाजपा नेते तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.
कर्जत-जामखेड हे तालुके दुष्काळी भागात असल्याने या तालुक्याला कायम पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. राजकारणी मंडळी प्रत्येक निवडणुकीत याच कुकडीच्या पाण्यावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. शेवटी निवडणुका संपल्या कीं या तालुक्यातील जनतेला पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागते हे देखील तितकेच खरे आहे.
महाविकास आघाडीचे किंग मेकर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील याचं कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याचं राजकारण करत तालुक्यातील नागरिकांना आशेचा किरणं दाखविला. नागरिकांनी देखील नवा युवा चेहरा आपल्यासाठी जीवाचं रान करेल या आशेवर रोहित पवार यांना भरघोस मतांनी विजयी केले. पवारांनी देखील निवडूक प्रचारादरम्यान या तालुक्यात भासलेली पाण्याची तहान टँकरद्वारे भागविली आणि बारामती पॅटर्न वापरत भाजपाच्या नेत्याला धोबीपछाड देत कर्जत-जामखेड मतदारसंघ काबीज केला.
मात्र, आता पुन्हा कुकडीच्या पाण्यावरून राजकारण सुरू झालं असल्याने कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदेकरांना त्यांना हक्काचे पाणी मिळणारं तरी कधी? हाच प्रश्न आता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

परिक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला निर्णय?

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. राज्यात अनलॉक १ ची नियमावली जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे.

नवमहाराष्ट्र न्यूज

राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे, तिथे त्या पद्धतीने का होईना, पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उपलब्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र पुढील काळात विभागाची स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही ते म्हणाले. सद्य:स्थितीत गुगल क्लासरूमचा वापर सुरू करण्यास त्यांनी मान्यता दिली.