राष्ट्रिय

आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांच्या अंगलट आल्यानंतर आधारला जाग आली आहे.

नवी दिल्ली- आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांच्या अंगलट आल्यानंतर आधारला जाग आली आहे. कारण, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर सार्वजनिक करु नका, असे आवाहन यूडीआयईकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपला १२ अंकी आधार क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला देण्यात आला आहे.

आधार क्रमांक शेअर करणे चुकीचे आहे, असे करणे कायदेशीरही नाही. नागरिकांनी स्वत:ही आधार क्रमांक शेअर करु नका आणि इतरांनाही करु देऊ नका. याशिवाय आधार क्रमांकाबाबत कुणाला चॅलेंजही करु नका असे यूआयडीएआयने म्हटले आहे.

या सर्व प्रकरणाची सुरूवात दोन दिवसांपूर्वी आर. एस. शर्मा यांनी आधार क्रमांक सार्वजनिक केल्यानंतर झाली. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा त्यांनी केला होता. आपल्याला यामुळे कोणतीही हानी होऊ शकत नाही. तसे असेल तर हॅक करुन दाखवा, असे चॅलेंजच शर्मा यांनी नेटिझन्सना दिले होते.

त्यानंतर अनेक हॅकर्सनी शर्मा यांची गोपनीय माहिती मिळवल्याचा दावा केला. इलियट अँडरसन या फ्रान्सच्या सुरक्षा तज्ज्ञाने तर शर्मा यांची बरीच गोपनीय माहिती उघड केली. एथिकल हॅकर्स या ग्रुपने तर थेट शर्मा यांचे बँक डिटेल्स मिळवून पेटीएम आणि भिम अॅपद्वारे १ रुपया पाठवल्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला. त्यानंतर एक दिवसापूर्वीच त्यांच्या मुलीलाही इ-मेलद्वारे धमकी मिळाली असून खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

धमकीच्या इ-मेलमध्ये, शर्मा यांचे इ-मेल अकाउंट हॅक झाले आहे आणि त्यांचे पंजाब नॅशनल बँकेचे खातेही लवकरच हॅक होण्याचा धोका आहे. सोशल मीडियावर चॅलेंज देऊन शर्मा यांनी हॅकर्सना निमंत्रण दिले आहे आणि देशाची मान शरमेने झुकवली आहे. जर शर्मा यांनी त्यांचे अकाउंट डिलीट केले नाही तर त्यांच्या महत्त्वाच्या फाइल्स सार्वजनिक करु, तसेच त्यांच्या फोनमध्ये व्हायरस सोडला जाईल. २४ तासांमध्ये इ-मेलला उत्तर आले नाही तर परिणाम भोगायला तयार राहा असे म्हटले आहे. इ-मेलमध्ये खंडणीची मागणीही करण्यात आली आहे.