कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण
– आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बाणेर येथील युतिका सोसायटीचा उपक्रम

Navmaharashtranews

पुणे : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाला सर्वांचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
बाणेर येथील युतिका सोसायटीमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश डमाळे, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झाले तर मृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वंयशिस्त महत्त्वाची असल्याचे सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, स्वंयशिस्त पाळली तर आपण कोरोनाला रोखू शकतो, कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होवूच नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत: सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पुणे महानगरातील युतिकासारख्या सोसायटयांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश डमाळे यांनी बाणेर परिसरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहमे अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती दिली. युतिका सोसायटीच्या प्रतिमा येवलेकर यांनी सोसायटीने हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती; विधानसभा लढविणार असल्याची चर्चा

नवमहाराष्ट्र वेब टीम : बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshawar Pandey) यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या सरकारने हा राजीनामा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे गुप्तेश्वर यांच्या निवृत्तीला आणखी काही असताना देखील त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे ते बिहार विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा बिहारच्या राजकारणात रंगली आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पांडे यांनी सुशांत बिहारी असून त्याच्यावर अन्याय झाला असल्याची भूमिका मोठ्या पोटतिडकीने मांडली होती. एका वृत्तवाहिनीवरील पॅनल चर्चेत त्यांनी बिहारी अस्मितेचा मुद्दा जोरजोरात मांडला होता. तसेच सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर पांडे यांनी मीडियाशी बोलताना रिया चक्रवर्तीची औकात काढली होती. तेव्हापासूनच ते राजकारणात आज ना उद्या उतरतील अशी अटकळ बांधली जात होती.

मुंबईत जोरदार पाऊस,पालिकेकडून एक दिवसाची सुट्टी जाहीर!

Navmaharashtra News

मंगळवारी रात्रीपासूनच मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईत पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं (Waterlogging in Mumbai) चित्र दिसत आहे. अनेक भागातली वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. लोकल प्रवासाची परवानगी नसलेले सामान्य मुंबईकर रस्त्यावरून देखील आपल्या इच्छित स्थळी, कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीयेत. सकाळीच ऐन कामावर जायच्या गडबडीत पावसानं मुंबईकरांची दैना उडवून दिली आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचायचं कसं? या विवंचवेत असलेल्या मुंबईकरांनी मुंबई महानगर पालिकेचे (BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मात्र घरी परतण्याचं आवाहन केलं आहे. वेधशाळेनं मुंबईत पुढच्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रस्त्यात न अडकता घरी परतण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं आहे.
पालिकेकडून एक दिवसाची सुट्टी जाहीर!

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतान इक्बाल सिंह चहल (Iqbal singh Chahal) म्हणाले, ‘काल संध्याकाळपासून मुंबईत २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार पुढचे २४ तास पुन्हा जोरात पाऊस पडणार आहे. त्यामुळे आम्ही आजची एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईच्या नागरिकांना माझी विनंती आहे की अतिशय महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. कारण आज दिवसभरात मुसळधार पाऊस पडणार आहे. महानगरपालिकेचा इमर्जन्सी स्टाफ सोडून सगळ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.’

Navmaharashtranewsदरम्यान, ५०० मिमीच्या वर पाऊस झाल्यास मुंबईची ड्रेनेज सिस्टीम उपयोगी ठरत नाही असं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘काल संध्याकाळपासून मुंबईत २५० मिमी इतका मुसळधार पाऊस (Raining in Mumbai) सुरू आहे. मुंबईची ड्रेनेज सिस्टीम ५०० मिमीच्या वर पाऊस पडला पाणी Drain Out करू शकत नाही. आपण त्याला अतिवृष्टी म्हणतो. आत्तापर्यंत मुंबईत २५० मिमी पाऊस पडला आहे. मुंबईत २५० पंप चालू आहेत. त्यामार्फत पाणी बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी देखील दिवसभर पाणी साचलेल्या भागांत फिरणार आहे. माझं सगळ्यांना आवाहन आहे की त्यांनी पुन्हा घरी जावं. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की सर्व परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करावी’, असं आवाहन आयुक्तांनी (BMC Commissioner) मुंबईकरांना केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

Navmaharashtra News
सातारा : मराठी चित्रपट सृष्टीतील गुणी ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साता-यात आल्या होत्या. याचठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

सध्या एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाठार या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील काहीजणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने या मालिकेतील सेटवरील सुमारे २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,त्यांची प्रकृती चिंताजनक होती. यावेळी अलका कुबल या त्यांच्या सोबत होत्या.

आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. ‘गुंतता हृदयी हे, वार्यावरची वरात, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांनी सर्व जातींच्या बहुजनांचा उद्धार केला,मग तुमची अशी भूमिका का?

तुम्ही केवळ मराठा समाजाची बाजू घेत आहात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना न्याय दिला. शिवरायांचे वंशज राजर्षी शाहू महाराजांनी सर्व जातींच्या बहुजनांचा उद्धार केला. तुम्ही त्या महापुरुषांचे वंशज आहात, मग तुमची अशी भूमिका का? असा प्रश्न एका विद्वान जाणकाराने विचारला.त्यांना खासदार छत्रपती संभाजीराजेंनी उत्तर दिले ते त्यांच्याच शब्दात

शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारले. त्यावेळी परकीयांनी इथल्या भूमीपुत्रांवर जुलूम सुरू ठेवला होता. त्यामुळे महाराजांनी सर्वांमध्ये स्वाभिमान चेतवला. ज्याची जशी योग्यता तशी जबाबदारी त्या व्यक्तीवर सोपवली. हे करत असताना कोण उच्च जातीतला, कोण कनिष्ठ जातीतला हा भेद केला नाही. सर्वांना सोबत घेतले.

विसाव्या शतकात राजर्षी शाहू महाराजांना लक्षात आलं, की जाती विषमते मुळे समाज खूप मागासला गेला आहे. सर्वदूर अज्ञानाचा काळोख आणि गरिबीमध्ये हा बहुजन समाज अडकून पडलेला आहे. तेंव्हा महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणाची व्यवस्था आणली. देशात पहिल्यांदा शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण लागू केलं. तेंव्हा अनेक समाजांना आधुनिक शिक्षण घेणं दुरापास्त होतं. सरकारी नोकरी तर दूरचा विषय. आज आपण जे आरक्षण बघतोय ती राजर्षी शाहू महाराजांची देणगी आहे. डॉ बाबासाहेबांनी हेच आरक्षण पुढे संविधानात ठेवले.

राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा समावेश होता. आज आरक्षणापासून हा समाज दूर आहे. कोण कुठल्या जातींत जन्माला आला म्हणून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतो. प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेप्रमाणे समान संधी मिळाली पाहिजे. आजच्या कायद्यानुसार जे आरक्षण मिळतं त्यात गरीब मराठ्यांना संधी मिळत नाही.

राजर्षी शाहु महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणाचा कायदा लागू केला तो सर्व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. म्हणजे जो समाज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची ती उपाययोजना आहे. आज मराठा समाज मुख्यप्रवाहाच्या बाहेर फेकला गेला असल्याने त्याला खरी आरक्षणाची गरज आहे.

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जाती विषमता कमी करण्यासाठी आरक्षणाचा फार मोठा उपयोग होतो.
नाहीतर जो समाज वंचित आहे, मागासलेला आहे त्याला कायम आपल्यावर अन्याय होतो असे वाटणार आणी जाती-जातीत समाजामध्ये तेढ निर्माण होणार. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात आणि नंतरही विशिष्ट समाजांमध्ये ही भावना होती. आज तीच भावना मराठा समाजामध्ये आहे. यापेक्षा आरक्षणाच्या आधारे सर्वांना समान संधी देणे हे राज्यकर्ते म्हणून सरकारचे कर्तव्य आहे.

….आणि म्हणून मी अन्याय ग्रस्त मराठा समाजाची बाजू घेत आहे. राजकारण विरहित सामाजिक एकोप्यासाठी माझे प्रयत्न आहेत. ते मी शेवट पर्यंत करत राहणार. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून माझे ते परम कर्तव्य आहे.

शहिद सचिव जाधव यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Navmaharashtranews

सातारा : शहीद सचिन संभाजी जाधव यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामधील दुसाळे या त्यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी जाधव कुटुंबीयांसह उपस्थितांनी साश्रुनयनांनी शहीद सचिन जाधव यांना अखेरचा निरोप दिला.

जाधव यांना भारत चीन सीमेवर लेह लडाख भागात वीरमरण आलं. १६ सप्टेंबरला कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले. सचिन 111 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक पदावर कार्यरत होते. ते लेह-लडाखमध्ये देशसेवा बजावत असताना बुधवारी यांना वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सचिन जाधव यांना वीरमरण आल्याची बातमीनंतर जाधव कुटुंब आणि संपूर्ण दुसाळे गावावर शोककळा पसरली आहे.

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा- संभाजी ब्रिगेड

मराठा आरक्षणास (Maratha Reservetion) सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. अनेक वर्षापासून मराठा बांधव आरक्षणाचा लढा लढत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे आरक्षण आंदोलनांमध्येच अडकून पडले आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली.

याबाबत संभाजी ब्रिगेडने त्यांची भूमिका व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवले आहे. हे निवेदन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांनाही देणार असल्याची माहिती शिवानंद भानुसे यांनी दिली.

मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.

शिवानंद भानुसे म्हणाले, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशीच आमची सुरुवातीपासून म्हणजेच 1991 पासूनची आहे. हा हा निर्णय करणं महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करेल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच भानुसे म्हणाले, मराठा सेवा संघ आणि त्याचे 33 विभाग गेली 30 वर्षे मराठा आरक्षणाची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगाला आदर्श ठरतील असे 58 मोर्चे काढले.”

संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थितीत 18 सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यामध्ये मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील १४४ कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील आंदोलनामुळे-चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वादंग पेटले आहे . या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला . मुंबईतील १४४ कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील (Maratha Community) आंदोलनामुळे लावण्यात आले आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, १५०० कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. या वर्षी ६४२ कोर्सेसना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, १० लाखांचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. गेले तीन महिने व्याज भरलेला परतावा बँकेच्या खात्यात नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावलेली आहे.

ती पुन्हा रिव्हाई करा. अजित पवार हे डायनामिक नेते आहेत. सरकारमध्ये मोठा प्रॉब्लेम हा निर्णयाच्या स्पीचचा आहे. निर्णय लवकर होत नाहीत. घोंगडी भिजत पडले, अजित पवारांकडे हा विषय आल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत, असेही पाटील म्हणाले.

एकत्रित प्रयत्नाने कोरोनाला पराभूत करण्यासाठी सज्ज व्हा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

  • माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेस मंगळवारपासून जिल्ह्यात प्रारंभ
  • विजयादशमीच्या मुहूर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करुया
  • घरोघरी सर्वेक्षण करुन आजारी व्यक्तींची तपासणी करा
  • एकत्रित प्रयत्नाने कोरोनाला पराभूत करण्यासाठी सज्ज व्हा
  • पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर १४ सप्‍टेंबर – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे ठरविले असून आपल्या जिल्ह्यात मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबरपासून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेत कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणार्‍या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत. ही मोहिम २५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असून या मोहिमेतून कोरोनाला हदद्पार करुन विजयादशमीच्या मुहुर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करण्याचा संकल्प करुया. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्ह्यात उद्यापासून (दि. १५ सप्टेंबर) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला आणि मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी प्रमुख अधिकारी या दरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि कोमॉर्बीड आजारी व्यक्‍तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यात “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” राबविण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात घरोघरी ही मोहिम राबवा. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्यविषयक माहिती घेऊन जे आजारी आहेत, कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांची माहिती या मोहिमेद्वारे मिळणार आहे. तसेच आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी ही मोहिम साहाय्यभूत ठरणार आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी कोरोनादूत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्यविषयक माहिती घेणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती यांचे पदाधिकारी,सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच-सदस्य, अधिकारी- कर्मचारी सर्वांनी या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम दोन टप्प्यात होणार असून मोहीमेची पहिली फेरी दि.१५ ते दि.१० सप्टेंबर या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी दि.१४ ते २४ सप्टेंबर या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असेल तर दुसर्‍या फेरीचा कालावधी १० दिवसांचा राहणार आहे. सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि पदाधिकारी,, नागरिक यांनी याकामी योगदान देऊन जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपुष्टात आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, जिल्ह्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करुन सुरुवातीच्या टप्प्यातच संशयित रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना उपचार उपलब्ध करुन देणे यास प्राधान्य देण्यात येत आहेत. लक्षणे असणार्‍या रुग्णांना तात्काळ कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. नागरिकांनी आजाराची लक्षणे जाणवत असतील तर तात्काळ तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन वारंवार तसे आवाहन करत आहे. घरातील प्रत्येक सदस्यांनी त्यांच्या कुटुंबातील कोणाला लक्षणे जाणवत असतील तर त्यांची तपासणी करुन घेतली पाहिजे. आता या मोहिमेमुळे प्रशासनाच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि उपस्थितांना मोहिमेची अंमलबजावणी आणि त्याची तयारी याबाबत माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) असे तिघांचे पथक असेल. एक पथक १ दिवसात ५० घरांना भेटी देईल. पहिली फेरी १५ दिवस असे गृहीत धरुन संपूर्ण लोकसंख्येसाठी एकूण पथकांची संख्या निश्चित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ****

‘वस्त्रहरण’कंगनाची तुलना द्रौपदीशी तर उध्दव ठाकरे दुशासन


वाराणसी: हिंदू पुराणकथा ‘महाभारत’ मधील महत्त्वाचे पात्र असलेल्या ‘द्रौपदी’ म्हणून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांचे वर्णन करणारे पोस्टर्स गुरुवारी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये लावण्यात आले. या पोस्टर्समध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाचे वस्त्रहरण दाखवले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रविजेता अभिनेत्रींचे रक्षण करणारे भगवान कृष्ण असे चित्रण केले आहेे. ही पत्रक वाराणसीतील स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांनी लावली आहेत. या पत्रकाचे औचित्य साधत मिश्रा म्हणाले की, कंगनाच्या शिवसेनेशी झालेल्या वादाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार ‘कौरव सेने’ सारखे वागत आहे.

मिश्रा म्हणाले की, केवळ पंतप्रधान मोदीच या देशातील महिलांच्या सन्मानाचे रक्षण करू शकतात. या संपूर्ण प्रकरणावर गप्प राहिल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवरही टीका केली.

कंगणाने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी केली असताना आपल्या वक्तव्यामुळे कंगना राणौत व शिवसेना यांच्यात घमासान वाद चालू आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर तिला मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचा आणि मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचेही तिने म्हटले होतेे.

शिवसेनेच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेने बुधवारी कंगनाच्या बंगल्यातील ‘बेकायदेशीर’ भाग पाडला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर कंगणाने सडकून टीका केली.

ट्विटरवर व्हिडिओ संदेश पोस्ट करताना ती म्हणाली: “‘ उद्धव ठाकरे… आज मेरा घर टूटा है, काल तेरा घमंड तूटेगा ’.

"उद्धव ठाकरे, तुझे क्या लगाता है (तुम्हाला काय वाटतं?). तुम्हाला वाटते की चित्रपट माफियांच्या संगनमताने माझे घर उध्वस्त करुन तुम्ही मोठा सूड घेतला आहे. आज माझे घर उध्वस्त झाले आहे, उद्या ते तुमचा अहंकार संपेल. हे काळाचे चक्र आहे. हे लक्षात ठेवा. हे नेहमी सारखेच राहत नाही. "

दरम्यान, महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांविरूद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सांगितले की, पक्षासाठी कंगना भाग संपला आहे. "कंगना रनौत भाग संपला आहे. आम्ही ते विसरलोही आहोत. आम्ही आता आपल्या दैनंदिन, सरकारी आणि सामाजिक कार्यात व्यस्त आहोत," राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संपूर्ण घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. सेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या युतीने महा विकास आघाडी सरकार स्थापन झाले.