“पार्थ हे जन्मजात फायटर”,पद्मसिंह पाटिलांच्या नातवाकडून कौतुक

Parth Pawar, Malhar Patil, Navmaharashtra news,

उस्मानाबाद: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलच फटकारलं आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांची फटकारल्या नंतर भारतीय जनता पार्टीचे (bjp) आमदार राणाजगजितसिंह पाटील (mla ranajagajit sinh patil) यांचे पूत्र मल्हार पाटील (malhar patil) यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून, पार्थ पवार यांचा उल्लेख जन्मजात फायटर असा केला आहे. (You are a born fighter and I’ve seen that since I was a child. I’m proud of you. We are from Osmanabad, we know how to fight.
Parth Ajit Pawar)आमदार पुत्राने पार्थ पवार (parth pawar) यांची पाठराखण केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मल्हार पाटील यांनी सदर पोस्ट नातेसंबधातून केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी आज पार्थ पवार यांच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अस म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यानंतर मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबत असल्याचा सोशल मीडियाद्वारे इशारा दिला आहे.

पार्थ पवार यांचे वडील अजित पवार आणि मल्हार पाटील यांचे आजोबा डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे. पार्थ पवार यांच्या भूमिकेला सर्वात आधी आजोळातून सर्वप्रथम समर्थन मिळत असल्याने चर्चेला उधाण आले आहे

पार्थ पवार अपरिपक्व – शरद पवार

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास असल्याचं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत”.

पार्थ लंबी रेस का घोडा…-नितेश राणे


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी करण्यावरुन आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं आहे. पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक उपहासात्मक ट्विट केलं आहे. “पार्थ लंबी रेस का घोडा” असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आज परत सांगतो…पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा”. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये इतर कोणताही संदर्भ दिलेला नाही. मात्र शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्विट केलं.

गोदी कामगारांचे श्रद्धास्थान डॉ. शांती पटेल यांचा ९९ वा जयंतीदिन

Shanti Patelस्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. ,शांती पटेल यांचा 8 ऑगस्ट 2020 रोजी 99 वा जयंतीदिन आहे. सध्याच्या कोव्हीड 19 मूळे आपण कोणताही जाहीर कार्यक्रम करू शकत नाही, मात्र त्या दिवशी माझगाव येथील कामगार सदनमध्ये डॉ. शांती पटेलसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात येईल.
आपणांस माहीतच आहे की, डॉ. शांती पटेल यांनी विद्यार्थी दशेत असतानाच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.गोदी कामगार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे, हे आपण गोदी कामगार कधीच विसरू शकत नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टचे ते 62 वर्षे विश्वस्त होते. पोर्ट उद्योगातील हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. साहेब तुमची आज क्षणा क्षणाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार यांना सातत्याने आठवण येते. तुमच्याजवळ देशहित, उद्योगहित व कामगारहीत याबाबत चांगला दूर दृष्टिकोन होता. संप कधी करायचा व कधी मागे घ्यायचा हे तंत्र तुम्हाला चांगले अवगत होते. तुमचा राजकारणातला अनुभव नेहमीच कामगारांच्या फायद्याचा ठरला. गोदी कामगारांच्या पगारवाढीची ज्या ज्या वेळेस मागणी असायची त्यावेळेस तुम्ही संबंधित मंत्रीमहोदयाना भेटून नेहमीच मार्ग काढीत होते, तुमच्या अनुभवामुळे व कामगार एकजुटीमुळे गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व पेन्शनवाढ मिळाली, हे गोदी कामगार कधीच विसरू शकत नाही. साहेब आज तुम्ही दिसत नसले तरी आमच्या हृदयात कायमस्वरूपी तुम्ही आहात. गोदी कामगार व कामगार चळवळीतील कामगार कार्यकर्ते आपणांस कधीच विसरू शकत नाही.
8 ऑगस्ट 2020 रोजी डॉ. शांती पटेलसाहेब यांची 99 वी जयंती आहे, त्यानिमित्त युनियनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व तमाम गोदी कामगारांतर्फे विनम्र अभिवादन.

आपला विश्वासू
सुधाकर अपराज
जनरल सेक्रेटरी
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना,या घटनेत पायलटचा मृत्यू


केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पायलटचा मृत्यू झाला आहे.

हे विमान दुबईतून केरळच्या कोझिकोड विमानतळावर उतरलं. यात १९१ प्रवासी होते. अद्याप अपघाताचे कारण कळू शकलेले नाही. एअर इंडियाकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
या अपघातात किती लोक जखमी झाले आहेत ते देखील अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेत पायलटचा मृत्यू झाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहीतीने समजण्यात येत आहे. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहे.

पुण्यनगरीकार मुरलीधर शिंगोटे यांचे निधन

पुणे :‘पुण्यनगरी’ वृत्तसमूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे 6 ऑगस्ट २०२० ला दुपारी एक वाजता त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुखवाडी तालुका जुन्नर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या छोट्याशा गावातून जगण्यासाठी तोंडी लावण्यापुरती वाचन आणि लिखाण करण्यासाठी शाळा शिकलेला एक मुलगा मुंबईला जातो. सुरुवातीला पडेल ती कामे करून उदरनिर्वाह करतो आणि त्यातूनच वृत्तपत्र वितरणाची कामे करतो. हळूहळू स्वत:ची वृत्तपत्र एजन्सी सुरू करतो आणि अल्पावधीतच आपले नाव मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणात मोठे करतो. ते नाव म्हणजे मुरलीधर अनंता शिंगोटे. गिरगावात त्या काळात जुन्नरच्या दांगट नावाच्या व्यक्तीची वितरण एजन्सी होती. या दोन जुन्नरकरांनी त्या काळात अख्ख्या मुंबईची वितरण व्यवस्था ताब्यात घेतली. दक्षिण भारतातील इनाडू, गुजरात मधील गुजरात समाचार, संदेश यांसह डझनभर वृत्तपत्रांची वितरणाची एजन्सी ताब्यात असलेल्या मुरलीधर शिंगोटेंनी(बाबा) 80-90 च्या दशकात महाराष्ट्रातील वितरण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता.

वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी ताब्यात असलेल्या मुरलीधर शिंगोटेंना आपलेही एखादे दैनिक असावे, याबाबतचा विचार मनात झुंजी घालू लागला. त्यानुसार त्यांनी ‘मुंबई चौफेर’ हे टॅबोलॉईड सायंदैनिक सुरू केले. त्यानंतर ‘आपला वार्ताहर’, ‘पुण्यनगरी’, ‘हिंदमाता’, ‘कर्नाटक मल्ला’ ही दैनिके कोणतेही भांडवल पाठिशी नसताना फक्त वाचकांच्या जोरावर मुरलीधर शिंगोटे बाबांनी सुरू केली. यातील पुण्यनगरी दैनिक महाराष्ट्रातील वृत्तपत्र क्षेत्रातील मैलाचे दगड ठरले. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी दैनिक ‘पुण्यनगरी’च्या जिल्हावार आवृत्त्या आहेत. खपाच्या दृष्टिकोनातून ‘पुण्यनगरी’ आपला स्वतंत्र असा वाचकवर्ग तयार केला आहे. या दैनिकाने अल्पावधीतच यश संपादन केले. हे केवळ मुरलीधर शिंगोटे यांच्या अनुभवामुळेच. ‘साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी’ हा नियम शिंगोटे बाबांनी तंतोतंत पाळला. एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचे मालक असूनसुद्धा बाबांनी खोट्या व बेगडी प्रसिद्धीला कधीच थारा दिला नाही. बाबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये ठसा उमटवला. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. ‘पुण्यनगरी’ वृत्तसमूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे 6 ऑगस्ट २०२० ला दुपारी एक वाजता त्यांचे जन्मगावी गायमुखवाडी तालुका जुन्नर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत.

मोहोळमध्ये महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक

Vikas Waghmare,Mohol Solapur

सरकारला सद्बुद्धी येऊ दे, महादेवाला घातले साकडे

सोलापूर /प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी व रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून उपसरपंच शेखर चोरमुले व भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली.

महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करत दुधाची नासाडी न करता गरजूंना दूध वाटून आंदोलन संपन्न झाले. दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले पाहिजे. माहाविकास आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा इरादा केला आहे का? या सरकारच्या काळात पाणी 25 रुपये लिटर आहे मात्र दूध 17-19 रुपये लिटर आहे ही विदारक परिस्थिती आज राज्यात आहे, येणाऱ्या काळात तातडीने जर सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाही तर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांनी यावेळी दिला.

यावेळी उपसरपंच शेखर चोरमुले, सिद्धेश्वर पवार, अनिल गावडे, भीमराव वाघमारे, नवनाथ वाघमारे, बजरंग माणके, नामदेव वाघमारे, नितीन पाटील आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SSC Result 2020: दहावीचा निकाल उद्या जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (२९ जुलै २०२०) रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल mahresult.nic.in.या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे. दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेत एक वेगळीच घटना घडली. यावेळी कोरोना साथीमुळे शेवटचा पेपर रद्द करावा लागला. पण त्यामुळे या पेपरचे गुण नेमके मिळणार कसे? याबाबत विद्यार्थ्यांना चिंता लागून राहिली होती. मात्र आता याबाबत काही नेमके संकेत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या जीव भांड्यात पडला आहे. दहावीची परीक्षा ३ मार्च २०२० ला सुरू झाली होती. यादरम्यानच कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २३ मार्चला होणारा भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला होता.

रद्द झालेल्या पेपरचे असे मिळणार गुण

दरम्यान, केवळ भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने शिक्षण मंडळ विद्यार्थ्याला इतर पेपरमधील गुणांच्या सरासरीनुसार भूगोलाचे मार्क दिले जाणार आहेत. रद्द झालेल्या पेपरबाबतचे नोटीस MSBSHSEकडून जाहीर करण्यात आली होती. तसेच ९ आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने घेतला आहे.

दरम्यान, दहावीचा निकाल (SSC result 2020 Date) उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीचा निकाल उशिराने लागत आहे. एरव्ही बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच निकाल लांबणीवर पडले आहेत. महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असून विद्यार्थी http://www.maharashtraeducation.com आणि http://www.examresults.net/maharashtra या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. यात विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर ते ऑनलाईन निकाल पाहू शकतील.

११वी ऑनलाईनचे प्रवेश वेळापत्रक

  • २२ जुलै – २२ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे
  • २४ जुलै – च्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेल्या माहितीची विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून ऑनलाईन पडताळणी
  • २६ जुलैपासून – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरूवात. विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करु शकतात. सुरूवातीला अर्जाचा पहिला भाग भरणे आणि मार्गदर्शन केंद्र निवडणे.
  • २७ जुलैपासून – अर्जाची तपासणी आणि व्हेरिफिकेशन
  • अर्जाचा दुसरा भाग दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर भरावा लागेल.

Amit Deshmukh विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको !


राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतू सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत.

प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.

अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे, असे महत्वाचे निर्देश अमित देशमुख यांनी यावेळी दिले आहेत.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.