संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही.

Nav Maharashtra News
संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका मांडली. छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व आणि आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी महाराज यांनी करावं असा ठराव नाशिकच्या बैठकीत झाला. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केल आहे. सातारा, कोल्हापूर छत्रपती एकत्रच आहेत असे सांगत नेतृत्व महत्वाचे नसून मराठा आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावे लागेल असे ते म्हणाले.

Nav Maharashtra News
राज्यसभेत मराठा समाजाचे नेते बोलत नव्हते. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ दे. गोळीचा होऊ दे की तलवारीचा होऊ दे. संभाजी छत्रपती ही मोहीम घ्या, असं सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून मी जाईल, असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं. दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण

१५ आँगस्टपासून चूलबंद आंदोलनाचा इशारा

पुणेयापुढे रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण करण्यात येईल अशी घोषणा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली. तोडफोड करणारे मराठा आंदोलक नसून मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. १५ ऑगस्टपासून आम्ही चूलबंद करुन अन्नत्याग आंदोलन करू.

आंदोलनात बाह्यशक्ती शिरल्या
मराठा मोर्चाने 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान जी तोडफोड झाली ती, मराठा आंदोलनात घुसलेल्या बाह्यशक्तीमुळे झाली, मराठा समाजातील बांधवांनी केलेली नाही, असा दावा मराठा समन्वय समितीने पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
आंदोलनात बाह्य शक्ती शिरल्या आहेत, त्या हिंसा करत असल्याचे मराठा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. हिंसक घटनेचा आम्ही निषेध करतो आणि हिंसा करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही असे यावेळी समन्वयकांनी सांगितले.तोडफोड करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते, काल झालेल्या बंदलाऔरंगाबाद, पुणे अशा ठिकाणी हिंसक वळण लागले.मराठा समाजातील बांधवांनी हिंसेचा अवलंब केला नसून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही समितीने केला. आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलिस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो, असंही समन्वयकांनी सांगितलं.
वळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.

नोव्हेंबर अखेर आरक्षण,मेगाभरतीला स्थगिती-मुख्यमंत्री

नवमहाराष्ट्र न्यूज आँनलाईन

राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासंबंधीची संपूर्ण वैधानिक कार्यवाही उशिरात उशिरा नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला दिली. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित सुरक्षित करूनच कायदेशीर चौकटीत मेगाभरती करण्यात येईल. शिवछत्रपतींचा पुरोगामी महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी चला आपण सारे एकत्र येऊ, असे आवाहन त्यांनी आज राज्यातील जनतेशी, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून, आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच काही खाजगी एफएम वाहिन्यांवरून संवाद साधताना केले.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणाले, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा यांची परंपरा महाराष्ट्र पुढे चालवितो आहे. परंतू सध्या राज्यातील घडामोडी या मनाला वेदना देतात. महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ५७-५८ वर्ष झालीत. या वाटचालीत विकासापासून वंचित, ज्यांच्यावर अन्याय झाला, अशांचा संघर्ष आपल्याला पहायला मिळतो आहे. आरक्षणाची लढाई ही आजची नाही. काही दशकांपासून ती सुरू आहे. आपले सरकार राज्यात सत्तेत येताच, आपण लगेचच मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला. मात्र, उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. राज्य सरकार त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले, मात्र, तेथे स्थगिती प्राप्त झाली नाही. राज्य सरकारने राज्यातील आणि देशातील ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. या सर्व मंथनातून आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मागासवर्ग आयोग जोवर समाजाच्या मागासलेपणाचा वैज्ञानिक अहवाल देत नाही, तोवर प्रत्यक्ष आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. न्या. म्हसे पाटील यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यानंतर न्या. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगापुढे विविध सर्वेक्षण, सुमारे १,८६,००० निवेदन आणि ऐतिहासिक पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे या आयोगाचा अहवाल हे एक महत्त्वपूर्ण दस्तावेज असणार आहे. तो प्राप्त होताच आरक्षणाचा हा प्रश्न हा निर्णायक टप्प्यात नेता येणार आहे. त्यामुळे न्यायालयात टिकेल, असे आरक्षण आपल्याला देता येणार आहे.

आम्हाला फसवणूक करायची नाही!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाला उच्च न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे आयोग आपली भूमिका त्यादिवशी मांडेलच. यानंतर आयोगाच्या कामकाजाचा एक कालबद्ध कार्यक्रम आपल्यापुढे येणार आहे. आयोगाचा अहवाल येताच एक महिन्याच्या आत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यास निर्देश देऊ शकत नाही. तरीसुद्धा उशिरात उशिरा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीची संपूर्ण वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरीसपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे आणि त्यादृष्टीने कार्यवाहीस राज्य सरकारने प्रारंभ केली आहे. आज काही लोक म्हणतात की, अध्यादेश काढून टाका. तो काढायलाही हरकत नाही. पण, अध्यादेश काढला की, लगेच स्थगित होईल आणि पुन्हा फसवणुकीची भावना निर्माण होईल. आम्हाला ही भावना निर्माण होऊ द्यायची नाही.

कायदेशीरदृष्ट्या सर्वांचे हित जपल्याशिवाय मेगाभरती नाही!
या आंदोलनातून एक प्रश्न महत्त्वाचा पुढे आला, तो मेगाभरतीचा. या निर्णयामुळे मराठा समाजाला असे वाटते की आपल्यावर अन्याय झाला. पण, या मेगाभरतीमुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका राज्य सरकारने वारंवार स्पष्ट केली आहे. आज या निमित्ताने मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, मेगाभरतीची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित कायदेशीरपणे जपल्याशिवाय, मेगाभरती सुरू केली जाणार नाही. सर्वांचे हित जपूनच निश्चित कालावधीत मेगाभरती केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजासाठी अनेक निर्णय
राज्य सरकारने मराठा समाजाचा विचार करताना केवळ आरक्षणापुरता विषय मर्यादित न ठेवता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना कर्जपुरवठा असे अनेक निर्णय घेतले. शैक्षणिक शुल्काच्या योजनेचा लाभ मिळण्यातील अडचणी दूर करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची एक बैठक आपण घेतली. वसतीगृहांच्या निर्मितीला वेग देण्यात आला आहे. कर्जासाठी क्रेडिट हमी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धनगर-अल्पसंख्याक समाजांनाही न्याय
धनगर आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर आरक्षणासाठी सुद्धा राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायंसेसकडून अहवाल मागितला आहे. वैधानिक कारवाई पूर्ण केल्याशिवाय, कुठल्याही आरक्षणाचे कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. टाटा इन्स्टिट्युटने अनेक राज्यात जाऊन, अनेक तालुक्यांमध्ये जाऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्याची कारवाई प्रारंभ केली आहे. ऑगस्ट अखेरीसपर्यंत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. हा अहवाल प्राप्त होताच, सरकार त्यावर सत्वर कारवाई करेल. अल्पसंख्याक समाजाबाबतही सरकारने अनेक निर्णय घेतले. प्रथमच आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी सुद्धा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळत आहे.

गुंतवणूक-रोजगार निर्मितीसाठी शांतता महत्त्वाची!
राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेतकरी, युवकांचे अनेक प्रश्न आहेत. जलयुक्त शिवार, शेतमाल खरेदीसारख्या अनेक निर्णयांतून सरकार परिवर्तन घडविते आहे. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, राज्यात केवळ संघटित क्षेत्रातच आठ लाखांवर रोजगार निर्मिती झाली आहे. देशातील सर्वाधिक ४२ ते ४७ टक्के विदेशी गुंतवणूक राज्यात येत आहे. ती येण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, राज्यात कौशल्ययुक्त मनुष्यबळ आहे, तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शांतता आहे. अशात जर आज मोठ्या प्रमाणात उद्योजक येत असलेल्या चाकणमध्ये अशा घटना घडत असतील तर उद्योजक गुंतवणूक करायला पुढे येतील काय, याचा विचार करावा लागेल. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून औरंगाबाद-जालना हे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून विकसित होते आहे. तेथे जर कधी धर्मासाठी, कधी जातीसाठी, कधी कचर्‍यासाठी हिंसा होत असेल तर ते दुर्दैवी आहे. याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

संवादातूनच निघेल मार्ग!
लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष आणि राज्य सुद्धा बदनाम होते. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, याचा मनाला फार त्रास होतो. याचा सरकार, समाज आणि आंदोलनकर्ते यांनी एकत्रित येऊन अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सरकार प्रत्येक वेळी सकारात्मकतेने विचार करते आहे. त्यामुळे चर्चेतूनच तिढा सोडवायचा आहे. अशात संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य आहे. महाराष्ट्र सरकार संवादासाठी सदैव तयार आहे, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. हे आवाहन गांभीर्याने घेऊन, संवादाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केले.

छत्रपतींचा महाराष्ट्र एकसंध ठेवूया…
रयतेच्या स्वाभिमानाची आणि मालमत्तेच्या रक्षणाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. छत्रपतींच्याच विचारांवर राज्य चालविण्याची आपली परंपरा आहे. आता संघर्ष पुरे झाला. चला आपण सारे एकत्र येऊन शिवछत्रपतींचा महाराष्ट्र एकसंध ठेवूया. या पुरोगामी महाराष्ट्राला सर्व मिळून आणखी पुढे नेऊया, असेही भावपूर्ण आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले

९ तारखेच्या आत निर्णय घ्या,उदयनराजेंचा सरकारला इशारा

पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे यांनी बैठकीनंतर आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा असे आवाहन त्यांनी करत आजपर्यंत जे बळी गेले त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. ताबडतोब तोडगा काढा नाहीतर उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले उदयनराजे ?

राज्यकर्त्यांना महाराष्ट्राने निवडून दिलंय. बाकीच्या समाजाला न्याय मिळाला मग मराठा समाजाला का नाही ?मराठा समाजाचा आता किती अंत बघायचा ? असा प्रश्न उदयनराजेंनी यावेळी केला. मागून पण हक्क मिळत नाही. कारण नसताना तुम्ही न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवता, कायदा बनवणारे, न्याय देणारेसुद्धा माणसंच आहेत मग त्यांना या तीव्र भावना समजत का नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लवकर निर्णय घ्या

मराठा रस्त्यावर येतो त्याला कारणीभूत कोण ? तुम्ही तज्ञ लोक आहात. बसा आणि काय असेल तो निर्णय लवकरात लवकर घ्या. आजपर्यंत जे बळी गेले त्याला जबाबदार कोण ? तो माणूस तुम्ही परत आणून देणार का ? एखादा माणूस जेव्हा जीव द्यायला जातो तेव्हा त्याच्यावर काय मानसिक ताण असेल याचा विचार करा. जो माणूस स्वत:चा जीव घेऊ शकतो तो दुसऱ्याचाही घेऊ शकतो याचा विचारही करायला हवा असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस भूमिका न घेणाऱ्यांना जागतिक पातळीवरचा संयमाचा पुरस्कार यांना द्यायला हवा असेही ते म्हणाले.

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून 20 जण ताब्यात 

पुणे :

चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्‍या चाकण बंद दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून 20 जणांना ताब्‍यात घेतले आहे. सोमवार (30 जुलै)च्या घटनेत वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणाऱया 100 हून अधिक तरुणांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून, सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक करून नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पोलीस अधीक्षक पाटील यांनी जिह्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ही घटना घडली असून, परवापासून ते येथे ठाण मांडून आहेत. जुन्नर तालुक्यात मराठा मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त पाठवून ते स्वतः वायरलेस यंत्रणेवर बसून संपूर्ण जिह्यावर नियंत्रण ठेवत होते.

तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची संयुक्त समिती करून अजूनही पंचनामे सुरू आहेत. अजूनही गाड्या तोडफोडीच्या तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या घेऊन पोलीस पथक पंचनामा करीत आहे. चाकणमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आली असून, जनजीवन सुरळीत झाले आहे. परिसरातील शाळा-महाविद्यालये व औद्योगिक कंपन्या सुरळीतपणे चालू झाल्या आहेत. महामार्गावर तसेच सर्व चौकांत आणि मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेत नुकसान झालेल्या लोकांना पंचनामा व इतर कागदपत्रे देण्याचे काम सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

१ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन; मराठा समाज

मुंबई – मराठा आरक्षण मुद्यावरून आंदोलन चिघळत असताना सकल मराठा समाजाकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत हा इशारा सरकारला देण्यात आला.

दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह हेही उपस्थिती लावणार आहेत.