केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

Nav Maharashtra News
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी ट्वीट करुन निधन झाल्याची माहिती दिली आहे. लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील रुग्णालयात हार्ट सर्जरी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते.
रामविलास पासवान हे ७४ वर्षांचे होते. रामविलास पासवान यांनी २००० साली लोकजनशक्ती पक्षाची स्थापना केली होती. रामविलास पासवान हे राजकारणात खूपच सक्रीय होते. वडिलांचे निधन झाल्याचं चिराग पासवान यांनी ट्वीट करुन सांगितलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये चिराग पासवान यांनी लिहिलं आहे, “पप्पा… आता तुम्ही या जगात नाहीत पण मला माहिती आहे तुम्ही जेथे कुठे आहात नेहमीच माझ्यासोबत असाल. मिस यू पप्पा.”
रामविलास पासवान यांचा विवाह १९६० साली राजकुमारी देवी यांच्यासोबत झाला. या दाम्पत्याला उषा आणि आशा दोन मुली आहेत. १९८१ मध्ये रामविलास पासवान यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी १९८३ साली रिना शर्मा यांच्यासोबत विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाले. रामविलास पासवान यांचा एकुलता एक मुलगा चिराग पासवान हा लोकजनशक्ती पक्षाचा अध्यक्ष आहे.