Gopichand Padalkar: राष्ट्रवादीचा गृहमंत्री होतो तेव्हा अत्याचार वाढतात

राष्ट्रवादीचा गृहमंत्री होतो तेव्हा अत्याचार वाढतात – आ.गोपीचंद पडळकर

सोलापूर: राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होतो तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात, असे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाळवणी गावात मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणुन त्याच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती.

त्या पीडित व्यक्तीची पडळकर यांनी बुधवारी भेट घेतली. आंतरजातीय प्रेमविवाहातून जरी हा प्रकार झाला असला तरी याला कोणीही जातीय रंग देऊन जातीय तेढ निर्माण होईल अस कृत्य करू नका असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले. पण त्याचवेळी “राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होतो तेव्हा तेव्हा राज्यात अन्याय अत्याचार वाढतात,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना महाराष्ट्राचा कोरोना म्हटले होते. त्यावरुन राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात निदर्शनेही केली होती. आता पुन्हा एकदा पडळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोहोळमध्ये महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक

Vikas Waghmare,Mohol Solapur

सरकारला सद्बुद्धी येऊ दे, महादेवाला घातले साकडे

सोलापूर /प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी व रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून उपसरपंच शेखर चोरमुले व भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली.

महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करत दुधाची नासाडी न करता गरजूंना दूध वाटून आंदोलन संपन्न झाले. दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले पाहिजे. माहाविकास आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा इरादा केला आहे का? या सरकारच्या काळात पाणी 25 रुपये लिटर आहे मात्र दूध 17-19 रुपये लिटर आहे ही विदारक परिस्थिती आज राज्यात आहे, येणाऱ्या काळात तातडीने जर सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाही तर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांनी यावेळी दिला.

यावेळी उपसरपंच शेखर चोरमुले, सिद्धेश्वर पवार, अनिल गावडे, भीमराव वाघमारे, नवनाथ वाघमारे, बजरंग माणके, नामदेव वाघमारे, नितीन पाटील आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपाचे राम शिंदे बसलेत उपोषणाला,कारण…

अहमदनगर: कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने राम शिंदे यांनी उपोषण सुरू केले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ मीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्री माथ्यावर कुकडी नदीचा उगम झाला आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात तिचा उगम झाल्यानंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत-वाहत घोडनदीला मिळते

दरम्यान, कुकडीचे पाणी हे शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील धरणातून जाते. मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात मिळणारं हक्काच पाणी अद्याप मिळाले नाही.

उन्हाळा संपत आला तरी पाणी नाही. उन्हाळात पाणी मिळणे गरजेचे होते. पाणी असूनही सोडण्याबाबत कोणतेही नियोजन होत नाही. राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच प्रशासनाकडून देखील कसलाही संपर्क होत नसल्याने भाजपा नेते तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.
कर्जत-जामखेड हे तालुके दुष्काळी भागात असल्याने या तालुक्याला कायम पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. राजकारणी मंडळी प्रत्येक निवडणुकीत याच कुकडीच्या पाण्यावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. शेवटी निवडणुका संपल्या कीं या तालुक्यातील जनतेला पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागते हे देखील तितकेच खरे आहे.
महाविकास आघाडीचे किंग मेकर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील याचं कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याचं राजकारण करत तालुक्यातील नागरिकांना आशेचा किरणं दाखविला. नागरिकांनी देखील नवा युवा चेहरा आपल्यासाठी जीवाचं रान करेल या आशेवर रोहित पवार यांना भरघोस मतांनी विजयी केले. पवारांनी देखील निवडूक प्रचारादरम्यान या तालुक्यात भासलेली पाण्याची तहान टँकरद्वारे भागविली आणि बारामती पॅटर्न वापरत भाजपाच्या नेत्याला धोबीपछाड देत कर्जत-जामखेड मतदारसंघ काबीज केला.
मात्र, आता पुन्हा कुकडीच्या पाण्यावरून राजकारण सुरू झालं असल्याने कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदेकरांना त्यांना हक्काचे पाणी मिळणारं तरी कधी? हाच प्रश्न आता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

संबित पात्रा रूग्णालयात दाखल, कोरोनाची लक्षणे दिसल्याने उपचार

Sambit Patra

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘कोरोना’ विषाणूची लक्षणे आढळल्याने संबित पात्रा यांना गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. (BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)

संबित पात्रा हा भाजपचा राष्ट्रीय स्तरावरील चेहरा आहे. भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. बर्‍याचदा ते टीव्हीवर चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसतात.

45 वर्षीय संबित पात्रा हे हिंदूराव रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते. ते ओएनजीसीच्या मंडळावरील संचालकांपैकी एक होते. 2012 मध्ये दिल्लीच्या काश्मिरी गेट विभागातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती, त्यात पात्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ राजकारणात झोकून देण्याचा निर्णय घेतला.

2014 मधील लोकसभा निवडणूकीच्या वेळी पात्रा यांनी भाजपसाठी प्रचार केला. टीव्हीवरील चर्चांमधून त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. भाजपची सत्ता आल्यावर पात्रा हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत पात्रा यांनी ओदिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांना 11,700 मतांनी पराभूत केले.

माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि भाजप नेते तेजिंदर पालसिंग बग्गा यांनी संबित पात्रा यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे ट्वीट केले आहेत. यामध्ये #DefeatCorona असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. (BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)

मी तर फकीर, आपण आपल्या साम्राज्याची काळजी करावी-चंद्रकांत पाटील

Navmaharashtranews
Chandrakant patil on vishwajeet kadam

आपण एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहोत. काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना सोमवारी दिले. कोरोनाच्या संकटकाळी भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कदम यांची त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली. विश्वजित कदम यांनी सांगली येथे बोलताना चंद्रकांतदादांना उद्देशून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये, अशी टिप्पणी केली होती. त्याला प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, आपण फकीर आहोत. आपल्यावर टीका टिप्पणी करण्यापूर्वी विश्वजित कदम यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी.

सांगलीत पूर आला त्यावेळी आपण काय केले, असा सवाल विश्वजित कदम यांनी केला आहे. पण मुळात आता संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या महाभयानक स्थितीचा सामना करत असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विश्वजित कदम सांगलीत काय करत आहेत, यांचे त्यांनी उत्तर द्यावे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. संकटकाळी भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून कदम यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. कोरोनाच्या साथीमध्ये भाजपा सत्तेत नसूनही जनतेच्या मदतीला धावून गेला आहे. पक्षातर्फे राज्यातील ४६ लाख लोकांच्या भोजन व्यवस्थेसह शिधा देण्यात आला आहे. अन्य मदतीची आकडेवारी मोठी आहे. अशा स्थितीत पालकमंत्र्यांच्या जबाबदारीनुसार भंडारा जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या विश्वजित कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी हाणला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत पूर आला त्यावेळी आम्ही काय‌ केले याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. पुराचा फटका बसलेल्या ४ लाख ७० हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले व १५ दिवस त्यांच्या भोजनाची आणि निवाऱ्यांची व्यवस्था केली. त्या लोकांना रोज ६० रुपये निर्वाह भत्ताही दिला. आसरा घेतलेले लोक परत आपल्या घरी जाण्यास निघाले, त्यावेळी त्यांना भांडीकुंडी व कपड्यांसाठी १५ हजार रुपये दिले. तसेच सहा महिन्यांचे रेशनही दिले. दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले.

शिवभोजन नंतर आता भाजपाची दीनदयाळ थाळी

Navmaharashtra News

शिवसेनेच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीनंतर आता भाजपाने आता दीनदयाळ थाळी चालू केली आहे. पंढरपूरमधून या दीनदयाळ थाळी योजनेची सुरुवात झाली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना डोळयासमोर ठेऊन या भाजपाने दीनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे.

शिवभोजन थाळीच्या तुलनेत दीनदयाळ थाळीची किंमत थोडी जास्त आहे. पण या थाळीमध्ये १० पदार्थ आहेत. शिवभोजन थाळी १० रुपयांना तर, दीनदयाळ थाळी ३० रुपयांना आहे. शिवभोजन थाळीत भात, भाजी, वरण आणि पोळी असे चार पदार्थ दिले जातात.तर दीनदयाळ थाळीमध्ये तीन चपात्या, डाळ, भात, भाजी, चटणी, पापड, लोणचे, कांदा लींबू याचा आस्वाद घेता येईल.विठ्ठल मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ ही थाळी आजपासून सुरु झाली आहे.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीचा शुभारंभ झाला. पंढरपूरातील एका महिला बचत गटाला सोबत घेऊन भाजपाने ही योजना सुरु केली आहे. दुपारी १२ ते एक या वेळेत ही थाळी सर्वांना दिली जाईल.

आम्ही गोळा-बारुद घेऊन तयार – आ.नितेश राणे

मला अभिमान आहे मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. ज्या पक्षाने सत्तेसाठी लाचारी केली नाही.. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार. बंगल्यात बसून आदेश देण सोपं असतं, आता सभागृहात उत्तर द्यायची आहेत.आम्ही गोळाबारूद घेऊन तयार आहोत”, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.  

  जवळपास एक महिना चाललेल्या नाट्यमय घडामोळीनंतर महाराष्ट्र्रात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापणा केली. उद्या सायंकाळी साडे सहा वाजता उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले नितेश राणे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर तीन विक्रम

Devendra phadanvis resign

1) सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

2) अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री

सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचा देखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १९६३ मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर पी.के.सावंत यांच्याकडे आठ दिवसांसाठी मुख्यमंत्रीपद आले होते. यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा आठ दिवसांचा विक्रम देखील मोडीत काढला. अवघ्या तीन दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे.

3) एकाच महिन्यात दोनदा राजिनामा

याशिवाय एकाच व्यक्तीने महिनाभराच्या आत दोनदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचाही विक्रम आज फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

‘नॉट रिचेबल’ असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत दाखल

Nationalist Congress Party leader Dhananjay Munde
धनंजय मुंडे

राज्यातील सत्तास्थापनेबाबत सातत्याने घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले परळी मतदारसंघातील धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत दाखल झाले आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणाला एक वेगळे वळण आले आहे. आतापर्यंत बोले जात होते की, धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांच्यासोबत आहेत. मात्र, आता बैठकीला आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना ‘मी इथेच आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या बैठकीत नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारपासून कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नसलेले धनंजय मुंडे बैठकीला आल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

नेमके काय घडले?

अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली. मात्र, शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद झाला. त्यानंतर आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानसाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके, असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिले आहेत.

राज्यात भाजपशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकत नाही-देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Government Formation

नवमहाराष्ट्र वेब टीम : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असतील तरी सत्ता स्थापनेसाठी अनेक पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरुन भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत नवी सत्ता समीकरणं तयार करण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपशिवाय इतर कुणाची सत्ताच येऊ शकत नाही (Devendra Fadnavis on Government Formation), असा दावा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत आमदारांना भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस म्हणाले, “राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही. मुंबईत येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. लोकांमध्ये जाऊन भाजपचेच सरकार येणार असल्याचं ठासून सांगा. जेव्हा सरकार येणार असेल तेव्हा मुंबईत बोलावू.”

सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलावू. तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी शिवसेनेचा उल्लेख करणेही टाळले.

‘तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून’

आशिष शेलार यांनी बैठकीची अधिकृत माहिती देताना आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इतर पक्षातील चर्चांसोबतच सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहे.”

राज्यभरात 90 हजार बुथवर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. उद्यापासून (15 नोव्हेंबर) ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून (16 नोव्हेंबर) शहरी भागातील आमदार, परिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहे, अशीही माहिती आशिष शेलार यांनी दिली.