‘नॉट रिचेबल’ असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत दाखल

Nationalist Congress Party leader Dhananjay Munde
धनंजय मुंडे

राज्यातील सत्तास्थापनेबाबत सातत्याने घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले परळी मतदारसंघातील धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत दाखल झाले आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणाला एक वेगळे वळण आले आहे. आतापर्यंत बोले जात होते की, धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांच्यासोबत आहेत. मात्र, आता बैठकीला आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना ‘मी इथेच आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या बैठकीत नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारपासून कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नसलेले धनंजय मुंडे बैठकीला आल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

नेमके काय घडले?

अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली. मात्र, शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद झाला. त्यानंतर आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानसाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके, असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिले आहेत.

राज्यात भाजपशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकत नाही-देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Government Formation

नवमहाराष्ट्र वेब टीम : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असतील तरी सत्ता स्थापनेसाठी अनेक पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरुन भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत नवी सत्ता समीकरणं तयार करण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपशिवाय इतर कुणाची सत्ताच येऊ शकत नाही (Devendra Fadnavis on Government Formation), असा दावा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत आमदारांना भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस म्हणाले, “राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही. मुंबईत येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. लोकांमध्ये जाऊन भाजपचेच सरकार येणार असल्याचं ठासून सांगा. जेव्हा सरकार येणार असेल तेव्हा मुंबईत बोलावू.”

सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलावू. तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी शिवसेनेचा उल्लेख करणेही टाळले.

‘तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून’

आशिष शेलार यांनी बैठकीची अधिकृत माहिती देताना आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इतर पक्षातील चर्चांसोबतच सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहे.”

राज्यभरात 90 हजार बुथवर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. उद्यापासून (15 नोव्हेंबर) ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून (16 नोव्हेंबर) शहरी भागातील आमदार, परिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहे, अशीही माहिती आशिष शेलार यांनी दिली.

भाजपाचे ७ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, अजित पवारांना केलेत फोन

सत्तास्थापनेस असमर्थ ठरल्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे ७ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत तर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.निवडणूकीपूर्वी यांनी मेगाभरतीमध्ये भाजपात प्रवेश केला होता.

अजित पवारांना फोन करणारे सातपैकी 2 आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गरज पडल्यास आम्ही राजीनामा देऊ, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून मोठा संघर्ष निर्माण झाला. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला. मात्र सर्वाधिक जागा असल्याने सुरुवातीला भाजप सत्तास्पर्धेत पुढे होता. त्यामुळे मग निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी भाजपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

अनेक अपक्ष आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकत्रित म्हणजे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह आघाडीतील दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सुरू केल्याची माहिती आहे.

सर्वसाधारणपणे अपक्ष आमदार सत्तेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतात. आता राज्यात सत्तेचं समीकरणच बदलत असल्याने आधी पाठिंबा दिलेले आमदारही भाजपला धक्का देत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करणार नसल्याने आता अपक्ष आमदार भाजपची साथ सोडून इतर पक्षात जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राज्यातील सरकार आभासी आहे.संपूर्ण जनतेला केवळ आभास दाखवून त्यांची फसवणूक करत आहे

मुंबई – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील सरकार आभासी आहे. देशातील संपूर्ण जनतेला केवळ आभास दाखवून त्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका विरोधकांनी केली.

राज्यातील भाजप सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर करेल, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले. भ्रष्टाचारी मंत्री, वाढती गुन्हेगारी, दुष्काळ यासह अनेक प्रश्नांवर उद्याच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रावादीने नेते अजित पवार यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील नागरिक सरकारवर नाराज आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात पाण्याचा तुटवडा आहे. सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत, पण काम प्रत्यक्षात दिसत नाहीत. गल्ली ते दिल्ली युतीचे सरकार आहे. हे सरकार इतर पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेत आहेत. त्यांच्याकडे माणसे नाहीत का? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.

या सरकारवर पूर्वी ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना या सरकारने मंत्री केले. मात्र या सरकारला भ्रष्टाचारासंदर्भात उत्तरे द्यावी लागतील. केवळ सहा मंत्र्यांना काढून चालणार नाही. फडणवीस सरकारमध्ये अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहे. या साऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही अजित पवारांनी केली.

भाजपचा शेवटचा प्रवास सुरु झाला – छगन भुजबळ

देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता भाजपचा शेवटचा प्रवास सुरू झाला असून आम्हाला अच्छे दिन नको तर हमारे दिन हवे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.

छगन भुजबळ हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, २०१४ च्या निवडणुका भाजपने विकास या शब्दाला घेऊन लढवल्या आणि जिंकल्या. मात्र साडे चार वर्षात विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे जनतेने भाजपला पाच राज्यात नाकारले आहे.

भाजपला २०१९ च्या निवडणुकीत देखील याच परिणामाला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले तर हनुमनाची जात कुठली हे सुद्धा ते सांगायला लागले अशा शब्दात भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निशाण साधला. गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीतून अनेकजण भाजप मध्ये गेले आता पुन्हा ते घरवापसी करतील का या प्रश्नावर ते म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांचा भ्रमनिरास झाला असेल तर त्यांनी परत यायला हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी नवमहाराष्ट्रचे मोबाईल अँप डाऊनलोड करा.