ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक, १७ जूनला राज्यस्तरीय घंटानाद आंदोलन.

नवमहाराष्ट्र न्यूज आँनलाईन

ईव्हीएम हटाओ, देश बजाओ असा नारा देत वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश कोअर कमिटीने १७ जूनला राज्यस्तरीय घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर हे घंटनाद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिली.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृध्द आहे. जगातील अनेक लोकशाही देशांनी ईव्हीएम मशिन नाकारली आहे. मात्र भारतातील तमाम वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्विकार केला आहे. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात म्हणजे खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी मिळेल, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ हे राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अशोक सोनोने यांनी केले आहे.

वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार नाहीः प्रकाश आंबेडकर

नवमहाराष्ट्र वेब टीम

वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करणार नाही. महाराष्ट्रातील ४८ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ दौ-यावर पत्रकारांशी बोलतांना दिली.

आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस सोबत घेण्यासाठी आग्रही आहे. मात्र आंबेडकरांचा 12 जागांचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नसल्यामुळे त्यांनी आंबेडरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. यामुळे आंबेडकरांनी काँग्रेस सोबत न जाण्याचा निर्णय घेतला. आंबेडकर म्हणाले की, 2005, 2009, 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माझ्या विरोधात उमेदवार उभे केले होते. आम्ही स्वतः काँग्रेस सोबत युती करण्यास तयार होतो. मात्र, तरीदेखील त्यांनी स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनीही काँग्रेस आघाडी सोबत येण्यास माझी भेट घेतली होती. परंतु आम्ही आता काँग्रेस सोबत जाणार नाही. असेही आंबेडकरांनी सांगितले. यामुळे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत येईल.