मुंबईतील १४४ कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील आंदोलनामुळे-चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वादंग पेटले आहे . या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला . मुंबईतील १४४ कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील (Maratha Community) आंदोलनामुळे लावण्यात आले आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, १५०० कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. या वर्षी ६४२ कोर्सेसना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, १० लाखांचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. गेले तीन महिने व्याज भरलेला परतावा बँकेच्या खात्यात नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावलेली आहे.

ती पुन्हा रिव्हाई करा. अजित पवार हे डायनामिक नेते आहेत. सरकारमध्ये मोठा प्रॉब्लेम हा निर्णयाच्या स्पीचचा आहे. निर्णय लवकर होत नाहीत. घोंगडी भिजत पडले, अजित पवारांकडे हा विषय आल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत, असेही पाटील म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

PicsArt_01-02-05.21.37.jpgकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीने भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला. अरुण इंगवले यांना 24 तर बजरंग पाटील यांना 41 मतं मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

जिल्हा परिषदेतील या निकालामुळे भाजप कोल्हापुरातून हद्दपार झाली आहे. कारण कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. शिवाय दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. याशिवाय महापालिकेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. केवळ कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र अडीच वर्षात ती सत्ता सुद्धा हातातून निसटली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडीने एकत्र येऊन कोल्हापूर झेडपीतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला होता. त्यामध्ये त्यांना यश आलं. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानंतर आता अडीच वर्षे विरोधात राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या साथीने सत्ता काबीज करण्याची तयारी केली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपने स्थानिक आघाड्यांना एकत्र करत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.

महाविकास आघाडीमुळे भाजपला जिल्हा परिषदेवरील आपली सत्ता टिकवणे प्रतिष्ठेचे बनले होते. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली होती. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिवसेनेला सोबत घेण्याची रणनीती आखली. त्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी प्रदेश पातळीवरून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे एक तारखेला आम्ही बहुमताच्या पुढे असू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीने भाजपची सत्ता उलथवून लावली आहे.

कधीकाळी एखादा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाजपला अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 67 पैकी तब्बल 14 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसलाही या निवडणुकीत 14 जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी बरोबरच स्थानिक आघाड्यांना एकत्र घेण्यात काँग्रेस मागे पडली आणि इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच  इतर स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन भाजपने 34 आकडा गाठून आपलं बहुमत सिद्ध केलं आणि अध्यक्षपदाची माळ भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्या गळ्यात पडली होती. मात्र शैमिका महाडिक या अडीच वर्षेच अध्यक्षपदी राहिल्या.

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 7 वा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभरात अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर गर्दी करतात. यावर्षीच्या स्मृतीदिनाला काहीशी वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. यावेळी ठाकरे कुटुंबातील पहिला ठाकरे निवडणूक मैदानात उतरुन विधानसभेत पोहचला आहे. दुसरीकडे शिवसेनेने भाजपसोबतच्या मागील 30 वर्षांपासूनच्या युतीचा मार्ग सोडत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर दर्शनासाठी येतात. यावर्षीच्या स्मृतीदिनाला काहीशी वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. कारण, पहिल्यांद्याच ठाकरे कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढवली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेऊन आघाडीशी घरोबा केला आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनीच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, तसं काही झालेलं दिसत नाही. सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय कधी होणार हे पाहावे लागणार आहे. शिवसेनेशी सूर जुळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेते यानिमित्त शिवतीर्थावर जातील अशी दाट शक्यता आहे. या तिन्ही पक्षांच्या  नेत्यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली होती.  

रुग्णालयातूनही संजय राऊतांची लेखणी सुरूच, अग्रलेख लिहितांनाचा फोटो व्हायरल

शिवसेनेचे नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत हे आजारी असूनही त्यांची शिवसेनेसाठी असलेली लढाई सुरूच आहे. त्यांनी आज सकाळी ‘लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती… बच्चन, हम होंगे कामयाब… जरूर होंगे’ असं ट्विट केलं. सध्या राऊत लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. मात्र सोमवारी रुग्णालयात दाखल केल्याने आज ते पत्रकार परिषद घेऊ शकले नाही. मात्र रुग्णालयातही त्यांची लेखणी थांबलेली नाही. रुग्णालयाच्या बेडवरुन ते सामनासाठी अग्रलेख लिहित आहेत.

त्यांच्या हातावर डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत.

सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयामधूनही त्यांची पत्रकारिता सुरूच आहेत. रुग्णालयात बसून उद्यासाठी अग्रलेख लिहित असल्याचा त्यांचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत रुग्णालयाच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातावर डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत. याही अवस्थेत संजय राऊत शिवसेनेला सत्तास्थापनेत सहभागी करण्यासाठी सक्रीय दिसत आहेत.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सोमवारी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा केला मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐन वेळी पाठिंबा पत्र न दिल्यामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचे चित्र आहे. सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होत आहे. दरम्यान राज्यात कोणाची सत्ता स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच बसवणार – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार, महाराष्ट्रात आपलचं सरकार येणार आहे. मुंबईतील मालाड येथील हॉटेल द रिट्रिटमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना असा विश्वास दिला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, आपण अजुनही युती तोडलेली नाही असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले असल्याचेही सांगितले जात आहे.

काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे वृत्त असून, त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागल्याचे दिसत आहे. हॉटेल द रिट्रीट येथे असलेल्या पक्षाच्या आमदारांबरोबर त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. तर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी सायंकाळपासून आमदारांबरोबरच असून ते देखील आमदारांचे मत जाणून घेत होते. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यादृष्टीने आता उद्धव ठाकरे आमदारांशी नेमकी काय चर्चा करणार? चर्चेनंतर कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादीच्या बळावर करणार का सत्ता स्थापन?

दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर,काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे.

भाजपा सत्तेच्या बळाचा दावा करणार का?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “अजून निर्णय झालेला नाही. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,”अशी माहिती त्यांनी दिली.